मोठी बातमी : जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक ऑक्टॉबर महिन्यात
जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । राज्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सहकार निवडणुक प्राधिकरणाने सहकारी संस्थाच्या निवडणुकीची प्रक्रिया थांबविली असून निवडणूक असतील त्या टप्प्यावरून ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे जिल्हा सहकारी दूध संघाची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून ऑक्टाेबरमध्ये मतदार यादी प्रसिद्ध हाेईल.
राज्यात ७६२० सहकारी संस्थाची निवडणुक प्रक्रिया सध्या सुरू अाहे. राज्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने सहकार विभागातर्फे या संस्थांच्या निवडणुकीचा टप्पा आहे त्या स्थितीत ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा सहकारी दूध संघाच्या प्रारूप मतदार यादीवरील हरकतींवर नुकतीच सुनावणी झाली. त्यावर निर्णय येणे अद्यापही बाकी आ. आता जिल्हा दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाल्यामुळे उर्वरीत प्रक्रिया ही थेट ऑक्टाेबर महिन्यात हाेणार आहे.
याआधी काय घडले
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी सहकार विभागाकडून मतदार यादी तयार केली जात असतांना मतदार म्हणून अनेक आमदारांनी स्वत:चे पत्ते बदल करून दुसऱ्या गावांमध्ये ठराव करून घेतले. या ठरावांविराेधात सहकार विभागाकडे तब्बल २३ हरकती नाेंदवण्यात आल्या. या हरकतींवर येत्या १४ जुलै राेजी नाशिक येथे सुनावणी हाेऊन निकाल दिला जाणार होता मात्र तो अनिर्णित राहिला.
जिल्हा सहकारी दूध संघासाठी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, आमदार गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार किशाेर पाटील, आमदार मंगेश चव्हाण, महापाैर जयश्री महाजन, माजी आमदार डाॅ. सतीश पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हा दूध संघाच्या मतदार यादीमध्ये नाव देण्यासाठी ठराव केले आहेत. यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी ज्या गावांमधून दूध साेसायट्यांचे सभासद आहेत.. राजकीय पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीत घुसखाेरी केल्यामुळे मूळ दूध उत्पादक मात्र डावलले जात आहेत. यासंदर्भात काही दूध उत्पादकांनी या आमदारांसह अन्य राजकीय पदाधिकाऱ्यांच्या ठरावावर हरकती नाेंदवल्या होत्या. १४ जुलै राेजी नाशिक येथे सहकारी उपनिबंधक (दुग्ध) यांच्याकडे सुनावणी झाली.