⁠ 
सोमवार, मे 20, 2024

मोठी बातमी : शिवाजी पार्कला दसरा मेळाव्यासाठी अखेर शिंदे गटाचा महापालिकेला अर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : आमचीच खरी शिवसेना आहे असा दावा करणाऱ्या शिंदे गटाने अखेर मुंबईतील शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला अर्ज केला आहे. या मुळे शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यासाठी या पूर्वीच अर्ज दाखल करणाऱ्या आणि आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होईल अशी ठाम भूमिका घेणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेत आणि शिंदे गटात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी हा अर्ज दाखल केला आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापत चालले आहे. दरवर्षी मुंबईतील शिवाजी पार्कात शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्याची परंपरा आहे. त्यानुसार शिवाजी पार्कातच दसरा मेळावा होणार असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. आमचीच शिवसेना खरी असा दावा करणारा शिंदे गट शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी दावा करेल याची कुणकुण असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याची घोषणा करून टाकली होती. मात्र, त्यानंतर आजपर्यंत शिंदे गटाकडून कोणतेही अधिकृत पाऊल उचलण्यात आलेले नव्हते. आज मात्र शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज दाखल केला.

विशेष म्हणजे शिवसेनेने यापूर्वीच शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यासाठी महानगरपालिकेकडे अर्ज दाखल केला असून महापालिकेने मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशात आता शिंदे गटाचा अर्ज दाखल झाल्याने महानगरपालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.