⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मोठी बातमी : फडणवीस-शिंदे यांची चर्चा, आज ७ वाजता होणार शपथविधी!

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । राज्यात गेल्या १० दिवसापासून सुरु असलेल्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला असून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद आणि विधान परिषद सदस्यत्वाचा बुधवारी राजीनामा दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील मविआ सरकार कोसळले असून भाजपने एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून सरकार स्थापनेची तयारी सुरु केली आहे. दहा दिवसानंतर एकनाथ शिंदे मुंबईत परतले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी ते पोहचले आहे. फडणवीस आणि शिंदे यांच्यात चर्चा सुरु झाली आहे. चर्चेनंतर दोन्ही नेते राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना झाले असून आजच सायंकाळी ७ वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आहे. शिंदे यांना शिवसेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी पाठिंबा दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून उद्या बहुमत सिद्ध करावे असे सांगितले होते. मविआ सरकारने याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बुधवारी रात्री त्यावर कामकाज झाले असता सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह येत मुख्यमंत्री पद व विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

विधान परिषद निवडणूक आटोपल्यानंतर दि.२० रोजी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी १३ आमदारांसह सुरत गाठले होते. दुसऱ्या दिवशीच आमदार अहमदाबादला पोहचल्यावर आमदारांची संख्या २५ झाली होती. एक-एक मंत्री आणि आमदार नॉट रिचेबल झाले तेव्हाच शिवसेनेत उभी फूट पडली होती. अहमदाबादहून बंडखोर आमदारांनी गुवाहाटी गाठले होते. गेल्या ९ दिवसापासून शिवसेनेचे ३९ आणि इतर अपक्ष असे ५२ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथे होते. बुधवारी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सकाळीच एकनाथ शिंदे गटाने गोवा गाठले होते.

सकाळी गोव्याच्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांसोबत बैठक घेत चर्चा केली होती. चर्चेनंतर एकनाथ शिंदे दुपारी मुंबईत पोहचल्यावर सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली होती. भेटीनंतर दोन्ही नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निवासस्थानी पोहचले असून त्याठिकाणी सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. राज्यपाल भवनातील दरबार हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली असून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजच सायंकाळी ७ वाजता राज्यपाल भवनात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे साध्या पणाने शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.