मोठी बातमी : ‘या’ तारखेला एकनाथ शिंदे येणार जळगावात !
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२३ । शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत जळगाव जिल्ह्यात 75 हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभाचे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 3 जून, 2023 रोजी संभाव्य जळगाव जिल्हा दौऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे.(eknath shinde in jalgaon)
याकरीता जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थींची निवड प्राधान्याने करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आज दिल्या आहेत.
‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे हे उपस्थित होते. तर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, सर्व विभागांचे विभागप्रमुख सहभागी झाले होते.
यावेळी जिल्हाधिकारी मित्तल म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे ध्येय आहे. या अभियानाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची यादी तयार करावी. या योजनांची माहिती, योजनेच्या लाभासाठी पात्रतेचे निकष आदि माहिती सर्वसमान्य नागरीकांपर्यंत पोहचवावी. प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करुन त्यांचेकडून अर्ज भरुन घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन घ्यावी. तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागाच्या 100 लाभार्थ्यांना उपस्थित ठेवण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता लक्षात घेता त्यांचे बैठक व्यवस्थे पिण्याचे पाणी आदि आवश्यक त्या सोईसुविधांचे नियोजन करावे. तसेच लाभार्थी निवड करतांना लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे आदि सूचना दिल्यात.
शासन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत जिल्हा व तालुकास्तरावर 15 जूनपूर्वी शिबिरांचे आयोजन करुन नागरीकांना योजनांचा थेट लाभ प्रदान करावयाचा असल्याने सर्व विभागांनी त्यादृष्टिने परिपूर्ण नियोजन करुन हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहनही श्री. मित्तल यांनी यावेळी केले. प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.