⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

मोठी बातमी : ईडीकडून खडसेंच्या मालमत्ता जप्तीच्या आदेशाला कोर्टाची स्थगिती

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिला आहे. ११ मालमत्ता रिकाम्या करण्याबाबत बजावण्यात आलेल्या नोटीसीला कोर्टाने स्थगिती दिली आहे.

भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि त्यांचे कुटुंबिय अडचणीत आले होते.आधी ईडीमार्फत चौकशी झाली असून त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांना देखील चौकशीला सामोरे जावे लागले होते. तर खडसेंचे जावई यांना ईडीने अटक केली होती. यानंतर ईडीने ३१ मे २०२२ रोजी पुन्हा एकनाथराव खडसेंसह चौघांना नोटीस बजावली होती. पीएमएलए अंतर्गत जप्त केलेल्या ११ मालमत्ता रिकाम्या करण्याबाबत ही नोटीस बजावण्यात आली होती.ईडीच्या या नोटीशीच्या विरोधात एकनाथराव खडसे यांनी दिल्ली येथील हायकोर्टात धाव घेतली होती. येथे या प्रकरणावर आज सुनावणी झाली. यात कोर्टाने ईडीच्या या कारवाईला स्थगिती दिली. यामुळे खडसे यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, याबाबत जळगाव लाईव्हशी बोलताना एकनाथराव खडसे म्हणाले की, माझ्यावर सुरु असलेला कारवायांचा ससेमिरा हा राजकीय आहे आणि हे जनता जाणून आहे. जाणीवपूर्वक माझ्यावर कारवाई करण्यात आली असली तरी मी न्यायायलीन लढाई लढत राहणार, असे खडसेंनी सांगितले.