शुक्रवार, डिसेंबर 1, 2023

मोठी बातमी : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविवारी येणार जळगाव शहरात ; पिंप्राळ्यात घेणार सभा !

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२३ । भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जळगाव शहरात रविवारी येणार असून पिंप्राळा येथे सभा घेणार आहेत. अशी माहिती भारतीय जनता पक्षांच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.(bavankule in jalgaon)

याबाबत अधिक माहिती अशी की, पक्ष संघटनेसाठी चंद्रशेखर बावनकुळे हे जळगाव जिल्हा दौरा करणार आहेत. शनिवारी ते जामनेर येथे गिरीश महाजन यांच्या घरी जाऊन पक्ष संघटने विषयी बैठक घेणार असून रविवारी जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरामध्ये सभा घेणार आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून जळगाव जिल्ह्याचा भारतीय जनता पक्षाचा जिल्हाप्रमुख आणि महानगर प्रमुख बदलाविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. अशावेळी जिल्हाप्रमुख म्हणून आणि महानगर प्रमुख म्हणून नक्की कोणाची वर्णी लागणार याविषयी विविध प्रकारच्या चर्चा भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत गटात सुरू आहेत. अशातच रविवारी पिंप्राराळा येथे येऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाची भावी रणनिती सांगणार असून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व महानगर प्रमुखांविषयी निर्णय देतील अशी माहिती सध्या मिळाली आहे.

जळगाव जिल्ह्यात येत्या काळात मोठ्या प्रमाणावर निवडणुका होणार आहेत. अशा वेळी जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, आमदारकी व खासदारकी अशा कित्येक निवडणूक होणार असल्यामुळे जिल्ह्याचे प्रमुख पद आणि शहराचे प्रमुख पद हे योग्य माणसाच्या हाती जावं अशी भावना कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची आहे. यामुळे लवकरच याचा निर्णय होणार असून यासाठीच चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवारी गिरीश महाजन यांच्या घरी जाऊन याबाबत बैठक घेणार असल्याचे समोर आले आहे.