⁠ 
रविवार, मे 12, 2024

मोठी बातमी : बीएचआर प्रकरणाचा तपास CID कडे सोपविण्यात येणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप नेते पुन्हा सक्रिय झाले आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय बदलवत ठाकरे, मविआ सरकारला धक्के देत असताना दुसरीकडे पुन्हा मविआ नेत्यांच्या मागे चौकशीचा फास आवळण्याची तयारी सुरू झाली आहे. दोन दिवसापूर्वी भाजप नेते आमदार गिरीष महाजन (Girish Mahajan) यांच्यासह इतर २८ जणांविरोधात दाखल गुन्ह्याची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्यात आली होती. दरम्यान, राज्यातील बहुचर्चित बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरण देखील सीआयडीकडे वर्ग केले जाणार असल्याची चर्चा आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-भाजपचे नवीन सरकार स्थापन झाले आहे. मात्र शिंदे सरकरकडून गेल्या सरकारकडून घेण्यात आलेले अनेक निर्णय रद्द केले जात आहे. त्यात आता नव्या सरकारने महत्त्वाच्या प्रकरणाचे तपासही महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) हातून काढून सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्याची तयारी आहे. त्यानुसार दोन दिवसापूर्वी भाजप नेते आमदार गिरीष महाजन (Girish Mahajan) यांच्यासह इतर २८ जणांविरोधात गुन्ह्याची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्यात आली होती.

शिंदे सरकरकडून राज्यातील दोन महत्त्वाची प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. त्यात राज्य शासनाच्या गृह विभागाच्या वतीने तसे निर्देश पोलिसांना दिले होते. आ.गिरीष महाजन यांच्यासह इतर २८ जणांविरोधात दाखल झालेला खंडणीचा गुन्हा तसेच आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना अडचणीत आणणारा फोन टॅपिंग अहवाल (Phone Tapping Case) लीक प्रकरणाशी संबंधित गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले होते.

आ.गिरीश महाजन यांच्यासह २८ जणांवर खंडणी आणि गुन्हेगारी कट रचल्याचा दाखल गुन्हा आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या २८ आरोपींनी पुणे पोलिसांवर केलेल्या आरोपांची चौकशीही सीबीआय करणार आहे.

दरम्यान, तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा अधिवेशनात गाजलेला पेन ड्राईव्ह बॉम्ब गिरीश महाजन यांच्यावर दाखल गुन्ह्यातील दाहक वास्तव उघड करणारा होते. या खळबळजनक प्रकरणात अनेक धक्कादायक घडामोडी येत्या दिवसात होणार असल्याचं बोललं जात आहे. नुकतेच प्रवीण चव्हाण यांना देखील काही प्रकरणातून बाजूला करण्यात आले आहे. भाजप नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मंत्री, नेते, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसाठी येणारा काळ त्रासदायक ठरणार आहे. संकटमोचक केव्हा, कुणाचे संकट दूर करेल आणि कुणाचे वाढवेल हे तर ‘एकनाथ’च्या कृपेने ‘देव’च सांगू शकतो.

राज्यात सत्तांतर झाल्यापासून आ.गिरीश महाजन प्रचंड सक्रिय झाले आहे. कालच त्यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्तार रखडला असला तरी भाजप नेते कामाला लागले आहे. अडीच वर्षापूर्वी १४ तासांच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंडळाने जे केले तसेच काही आता सुरू आहे. जळगावातील जेष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे भोसरी, ईडी प्रकरणामुळे अगोदरच अडचणीत असताना गुरुवारी शासनाने एक नवीन आदेश पारित केला आहे. जळगाव जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नेमणूक करीत भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी समिती देखील गठीत केली आहे.

राज्यातील बहुचर्चीत बीएचआर पतसंस्था घोटाळ्याचा तपास गेल्या काही महिन्यांपासून थंड झाला आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या विशेष पथकाकडून तपास केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी जळगावसह राज्यात एकाचवेळी मोठे धाडसत्र राबविण्यात आले होते. आ.गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीय मंडळींना बीएचआर प्रकरणात अटक करण्यात आली होती. तसेच मुख्य संशयीत सुनील झंवर यांचा मुलगा सुरज झंवरला देखील पथकाने अटक केली होती. बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने पुणे न्यायालयात पाच संशयितांविरुद्ध २५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. यात ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांची फसवणूक, अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यात महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम सांखला, कमलाकर कोळी, सुजित वाणीवर ठपका ठेवण्यात आला होता.

बीएचआरच्या तपासात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी अनेक संशयितांना सळो की पळो करून ठेवले होते. अटकेच्या भीतीने संशयीत इकडे तिकडे पलायन करीत होते. अवसायक जितेंद्र कंडारे याला पथकाने इंदौर येथून अटक केली होती. काही भाजप आमदार देखील बीएचआर प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती. आ.चंदूभाई पटेल यांना अटकपूर्व जामीन देखील मंजूर झाला होता. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बीएचआर प्रकरणाचा तपास देखील सीआयडीकडे सोपविला जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. बीएचआरचा तपास सीआयडीकडे सोपविणे म्हणजे सुनील झंवर यांच्यासह आ.गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीय संशयितांसाठी मोठा दिलासा मानला जाणार आहे.