मोठी बातमी : दिपनगर प्रकल्पामुळे होत आहे केळी पीकाचे नुकसान !
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुन २०२३ । दिपनगर प्रकल्पामधुन राख निघते यामुळे केळी पीकाचे नुकसान झाले आहे. बांधीत असलेल्या शेतकरी आंदोलकांनी दीपनगर प्रकल्पाच्या गेटवरच आंदोलन करीत केळी घड बांधून प्रशासनाचा निषेध केला. पर्यावरण दिना निमित्त हे आंदोलन करण्यात आले.
दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर चिमणीद्वारे उडाली राख पिंप्रीसेकम परीसरातील शेतकर्यांचे केळीसह अन्य पिकांवर उडत असल्याने उत्पादनात 40 टक्क्याहून अधिक घट होत आहे. .यावेळी दीपनगर प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, 22 दिवसानंतरही आंदोलकांची दखल घेतली जात नसल्याने आंदोलक आता जलसमाधी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राच्या पिंप्रीसेकम येथील रॉ वॉटर केंद्रासमोर पिंप्रीसेकमच्या शेतकर्यांनी ठिय्या आंदोलन मांडले असून 22 दिवसानंतरही महानिर्मिती व महावितरणने पाठ फिरवली आहे. कृषी फिडरवर 24 तास वीजपुरवठा करावा यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. या ठिय्या आंदोलनातील आंदोलक शेतकर्यांनी सोमवारी जागतीक पर्यावरण दिनी दीपनगर केंद्राच्या राखेच्या प्रदूषणाचा मुद्दा तापवत जोरदार आंदोलन करीत निदर्शने केली तर दीपनगर 210 व 500 मेगावॅट केंद्राच्या प्रवेशव्दाराला केळीचे घड बांधून आपला निषेधही व्यक्त केला.
पिंप्रीसेकमच्या रॉ वॉटर केंद्राजवळ ठिय्या मांडलेल्या शेतकर्यांनी सोमवार, 5 जून रोजी सकाळी 11 वाजता दीपनगर केंद्रात धडक देत 210 व 500 मेगावॅट प्रकल्पाच्या गेटवर नुकसान झालेल्या केळीचे घड बांधून प्रशासनाविरोधात निदर्शने केली. दीपनगर वा महावितरणच्या कोणत्याही जबाबदार अधिकार्यांनी आंदोलकांची भेट न घेतल्याने आंदोलकांनी पुन्हा ठिय्या मांडला.
महानिर्मितीने मुलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, विद्यार्थ्यांना स्कूल बस व ग्रामस्थांसाठी अॅब्युलन्सची व्यवस्था करावी, प्रकल्पग्रस्तांना त्वरीत रोजगार देण्यात यावा, गावातील कृषी फिडरवर पूर्वीप्रमाणे 24 तास वीजपुरवठा करावा, पिंप्रीसेकम गाव पूरग्रस्ताच्या यादीत येत असून गावाला भविष्यात गावठाण विस्ताराकरीता गट नं. 205 हि मिळकत गावठाणाकडे वर्ग करण्याचे आदेश जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडून निर्गमित करण्यात यावे आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे.
दीपनगर औष्णिक केंद्रासमोर झालेल्या निदर्शन आंदोलनात पिंप्रीसेकम संघर्ष समितीचे अध्यक्ष रमाकांत चौधरी, प्रगतशील शेतकरी रवींद्रसिंग चाहेल, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी, लोकसंघर्ष मोर्चाचे नेते चंद्रकांत चौधरी, शेतकरी पितांबर पाटील, संजय तायडे, जितेंद्र वारके, ब्रिजलाल पाटील, जालंदर पाटील, अरुण चौधरी, रवींद्र पाटील, अजय चौधरी, गौरव चौधरी, गणेश तायडे, भगवान चौधरी, निवृत्ती पाटील, रघुनाथ पाटील, पंडीत तायडे आदी उपस्थित होते.