⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

शहिद झालेल्या पोलिसांच्या पत्नींसाठी गृह विभागाचा मोठा निर्णय

जळगाव लाईव्ह न्यूज| १२ ऑगस्ट २०२३। कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या पोलिसांच्या विधवा पत्नीनं जर नंतर पुनर्विवाह केला तर तिला शासनाकडून मिळणार वेतन रोखलं जात होतं. त्यामुळे विधवांनी पुनर्विवाह केल्याने शहिदांच्या कुटुंबीयांची आर्थिक फरफट सुरु होती. परंतु, अशा विधवांना दिलासा दिलासा देण्याचा निर्णय राज्याच्या गृहविभागानं घेतला आहे. शासन निर्णयात म्हटल्याप्रमाणं, आपत्कालिन परिस्थितीत मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या विधवांसाठी पुन्हा वेतन सुरु करण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून पुनर्विवाह केला आहे, अशा विधवा पत्नीस कुटुंबीय या नात्याने दिवंगत अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत वेतन देण्यात मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सदर दिवंगत पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या पुनर्विवाह केलेल्या विधवांना 13 ऑगस्ट 2013 च्या निर्णयानुसार राज्य सरकारच्या निर्णयातील तरतुदींप्रमाणे संपूर्ण वेतनाचा लाभ अदा करण्यात येणार आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुनर्विवाह करणाऱ्या शहिदांच्या विधवांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, दिवंगत जवानांच्या उत्पन्नावर सर्वस्वी अवलंबून असणाऱ्या दिवंगत जवानांचे वयोवृद्ध आई-वडील, अविवाहीत/दिव्यांग बहीण/भाऊ व अज्ञान पाल्य इ. यांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल. तसे हमीपत्र संबंधित घटक प्रमुखांनी संबंधित विधवांकडून घ्यावे लागेल. दिवंगत जवानांच्या उत्पन्नावर सर्वस्वी अवलंबून असणाऱ्याच व्यक्तींचे पालन-पोषण करण्यात येत नसेल, तर संपूर्ण वेतनाचा लाभ बंद करण्यात येईल. तसेच याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने निराकारण झाल्यास पुढील संपूर्ण चेतनाचे प्रदान पुन्हा सुरु करण्यात येईल.

अनेक शहीद पोलिसांच्या पत्नीनं याबाबत तक्रारी केल्या होत्या की, पुनर्विवाह केल्यानंतर त्यांचं वेतन शासनाकडून बंद करण्यात आलं होतं. शासनाच्या या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यापार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.