⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | तिहेरी अपघातात भुसावळचा तरुण ठार ; वडिलांसाठी बघितलेलं स्वप्न राहिले अपूर्ण

तिहेरी अपघातात भुसावळचा तरुण ठार ; वडिलांसाठी बघितलेलं स्वप्न राहिले अपूर्ण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२१ । भुसावळकडून जळगावकडे राँग साइडने जाणाऱ्या ट्रॉलाने समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅनला धडक दिली. या वाहनांमध्ये दाबले जाऊन भुसावळ येथील दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना साकेगाव जवळ महामार्गावरील उड्डाणपुलावर शुक्रवारी मध्यरात्री घडली. तर इतर दोघे जखमी झाले. मुकेश रामकुमार परदेशी (वय ३१, रा.जामनेर रोड, रामानंद नगर, भुसावळ) असे अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, महामार्ग ६ वरील साकेगाव येथील उड्डाणपुलाच्या उतारावर शुक्रवारी रात्री सुमारे २ वाजेच्या सुमारास भुसावळकडून जळगावकडे निघालेल्या ट्रॉलाने (क्रमांक जीजे.१२-बीवाय.९५२१) जळगावकडून भुसावळकडे कोंबड्या वाहून नेणाऱ्या पिकअप व्हॅनला (क्रमांक एमएच.१४-ईएम.४४०२) धडक दिली. या वाहनांचा फटका पाठीमागून दुचाकीने (क्रमांक एमएच.१९-डीजी.०२२४) भुसावळकडे जाणाऱ्या मुकेश परदेशी (वय ३१) यास बसला. दोन्ही वाहनांमध्ये दाबल्या गेल्याने दुचाकीचा चुराडा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात पिकअप व्हॅन व ट्रॉला चालक किरकोळ जखमी झाले. जखमींना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस स्थानकाचे निरीक्षक विलास शेंडे, शहरचे निरीक्षक प्रताप इंगळे आणि नशिराबाद टोलनाका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची तालुका पोलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे.

दरम्यान, मुकेश यांच्या अपघातात मृत्यूची वार्ता घरी कळताच त्यांच्या पत्नीची शुद्ध हरपली. वडिलांचा एक पाय अधू असल्याने दोन दिवसांनी नाशिकला जावून आपण कृत्रिम पाय बसवू, असे मुकेशने वडील रामकुमार परदेशी यांना सांगितले होते. मात्र, वडिलांना कृत्रिम पाय बसवण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण राहिले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.