⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

भुसावळात बारागाड्या अनियंत्रीत झाल्याने एका भाविकाचा मृत्यू

चौघे गंभीर : जुना सातारा भागातील दुर्दैवी घटना

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ । भुसावळ शहरात मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढल्या जात असताना त्या अनियंत्रीत होवून भाविकांच्या अंगावर गेल्याने एका भाविकाचा जागीच मृत्यू ओढवला तर चार भाविक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार, 2 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. गुढीपाडव्याच्या सणालाच घडलेल्या या दुःखद घटनेने सणावर मात्र दुखाःचे सावट पसरले. गिरीश रमेश कोल्हे (42, गवळीवाडा, भुसावळ) असे मयताचे भाविकाचे नाव आहे.

बारागाड्या अनियंत्रीत होवून भाविक दगावला
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना सावटामुळे शहरातील जुना सातारा भागातील मरीमाता यात्रोत्सव रद्द करण्यात येत होता मात्र यंदा उत्सव होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शनिवारी सायंकाळी भगताने ग्रामदैवताला प्रदक्षिणा घातल्यानंतर मरीमातेच्या जयघोषात बारागाड्या ओढण्यास सुरुवात करण्यात आली मात्र याचवेळी बारागाड्या अनियंत्रीत झाल्याने त्या उत्सव पाहण्यासाठी आलेल्या भाविकांच्या अंगावर गेल्या व गर्दीत उभे असलेले भाविक गिरीश रमेश कोल्हे (42, गवळीवाडा, भुसावळ) यांचा मृत्यू ओढवला तर बारागाड्या लोटणारे चार भाविक जखमी झाले.

चार भाविक जखमी
अनियंत्रीत झालेल्या बारागाड्यांमुळे भाविक छोटू उत्तम इंगळे (33, कोळीवाडा, भुसावळ), धर्मराज देवराम कोळी (63, जुना सातारा, भुसावळ), मुकेश यशवंत पाटील (28, खळवाडी, भुसावळ) व शिक्षक नितीन सदाशीव फेगडे (गणेश कॉलनी, भुसावळ) हे चौघे भाविक जखमी झाले. या घटनेनंतर माजी नगरसेवक युवराज लोणारी, दीपक धांडे, भीमराज कोळी, मुकेश पाटील, राजेंद्र नाटकर यांच्यासह अन्य नागरीकांनी जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलवले. दरम्यान, या घटनेने गवळीवाड्यात शोककळा पसरली आहे. काही वर्षांपूर्वी शहर पोलिस दलातील एका कर्मचार्‍याचाही बारागाड्यांखाली आल्याने दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला होता.