नवरात्री विशेष : दोनशे वर्षांपूर्वीचे भवानी मातेचे जागृत देवस्थान
जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । जळगाव शहरात पिंप्राळा रस्त्यावर गावाच्या सुरुवातीलाच भवानी देवीचे मंदिर आहे. रस्त्यावर दिसणाऱ्या या मंदिराला फार प्राचीन इतिहास असून मंदिराला तब्बल दोनशे वर्ष झाली आहेत. भवानी मातेच हे मंदिर जागृत देवस्थान असून येथील परिसरातील भाविक नागरिक व ग्रामस्थ आपल्या शुभ कामाची सुरुवात येथील भवानी मातेचे दर्शन घेऊनच करतात. परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे हे भवानी मातेचे मंदिर गावाचे ग्रामदैवत मानले जाते.
जळगाव शहराचा विस्तार आज बराच मोठा झाला असून पिंप्राळा गाव देखील शहरातच आले आहे. पूर्वी पिंप्राळा गावाच्या शीव रेषेजवळ मुख्य रस्त्यावर भवानी मातेचे जागृत देवस्थान आहे. येथील ग्रामस्थ देवतेची अग्रपूजा केल्याशिवाय आपल्या शुभकार्याला सुरुवात करत नाही आणि भवानी मातेचे मंदिर रस्त्यावर असल्याने कोणताही व्यक्ती रस्त्याने जाता-येताना नतमस्तक होऊनच क्षणभर थांबल्याशिवाय पुढे जात नाही.
लिंबाच्या झाडाखाली होते देऊळ, त्याच जागी जीर्णोद्धार
रस्त्याच्या कडेस एका लिंबाच्या झाडाखाली देऊळ असून त्या देवळात देवीचा बाणा आहे. त्या बाण्यावरच देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. हे देऊळ पूर्वीच्याच आकारमानाचे असून तेवढ्याच जागेत मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. जीर्णोद्धार करताना संगमवरी दगड लावण्यात आले आहेत. काही कालावधीनंतर येथील वस्ती वाढू लागली व येथील ग्रामस्थ व नागरिकांच्या मागणीवरून गणपती, हनुमान, महादेव, व श्रीकृष्ण यांच्या मूर्तीची देखील देवळाच्या शेजारी मंदिराच्या जागेतच देऊळ बांधून स्थापना करण्यात आली.
१९५३ पासून सुरु झाली बारगाड्यांची प्रथा
मंदिराबद्दल आकर्षक ठरणारी गोष्ट म्हणजे इथे दरवर्षी मोठी यात्रा भरते आणि त्यादिवशी बारा गाड्या ओढल्या जातात. पिंप्राळासह परिसरातील लोक देवीच्या दर्शनासाठी व बारागाड्यांचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी एकत्र जमतात. बारगड्यांची प्रथा सन 1953 पासून कै. भावडू टिभा चौधरी यांनी सुरू केली असून ही परंपरा आजही सुरु आहे. बारागाड़ी ओढणारे भगत चार ते पाच वर्षानंतर बदलत असतात.
दरवर्षी पाच दिवस भरतो वैशाख महोत्सव
दरवर्षी पाच दिवस वैशाखी महोत्सव होत असतो. त्यात एक दिवस देवीची पालखी, तृतीयेस बारागाड्या, चतुर्थी व पंचमी दोन दिवस किर्तन सोहळा व सहाव्या दिवशी १०८ ओमकार दीपप्रज्वलन सोहळा व त्यानंतर लक्ष्मी ज्योत कार्यक्रम होत असतो. श्री.पंडितराव विसपुते व सुवर्णकार कार्यकर्ते यांनी १९७७ पासून नवरात्र उत्सव सुरू केला. दहा दिवस आनंदमय वातावरणात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. मंदिरावर रोषणाई केली जाते. दहा दिवस सकाळ-संध्याकाळ दर्शनासाठी अलोट गर्दी असते. दुर्गाष्टमीला पाच जोडपे पूजेस बसवतात. विधिवत होमहवन केला जातो. महाप्रसादाचे वाटप होते. विजयादशमीचे सीमोल्लंघन व देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. भवानी देवीचे मंदिर पूर्वीपासून मंदिराचे व्यवस्थापन अहिर सुवर्णकार पंचमंडळ यांच्याकडे आहे. याविषयी सन १९९० मध्ये धर्मदाय आयुक्तांकडे रितसर नोंदणी करण्यात आली. दररोज देवीचे पूजा-अर्चना आरतीसाठी येथे पुजाऱ्यांची नेमणूक करण्यात अली आहे. नवरात्र महोत्सव अगदी उत्साहाने येथे साजरा केला जातो.
व्हिडिओ लिंक :
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/813211402679760/