⁠ 

MPSC मध्ये दोनवेळा अपयश, पण जिद्द-चिकाटीने धरणगाव तालुक्यातील कन्या बनली अधिकारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२३ । धरणगाव तालुक्यातील डोणगाव येथील भारती पाटील या विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधकपदाच्या (सहकार) परीक्षेत यश संपादन केले. विशेष म्हणजे, भारतीने त्यासाठी कुठलाही क्लास लावला नव्हता. केवळ रात्रंदिवस अभ्यास व जिद्द आणि चिकाटी ठेवून ती सहकार खात्याची अधिकारी बनल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भारती पाटील हिचा बारावीनंतर इंजिनिअरिंगला नंबर लागला होता. मात्र, परिस्थितीमुळे तिने इंजिनिअरिंग न करता, जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयातून २०१८ मध्ये गणितात बी. एस्सी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्याचा निश्चय केला. त्यासाठी आई-वडिलांनीही तिला प्रोत्साहन दिले. ‘एमपीएससी’मध्ये पहिल्या दोन प्रयत्नात तिला काहीसे अपयश आले व त्यामुळे खचून न जाता तिने आपले प्रयत्न सुरुच ठेवले. २०२२ मध्ये दिलेल्या परीक्षेत तिने अखेर यश संपादन केले.

२०२० मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा ती उत्तीर्ण झाली होती. मात्र, मैदानावर सरावात फ्रैक्चर झाल्याने ही संधी हुकली होती. त्यानंतर मुख्य परीक्षेच्या काळात काही दिवस पुणे येथील श्रेयस बढे यांचे तिने ऑनलाईन मार्गदर्शन घेतले. एवढ्यावरच भारतीने हे यश संपादन केले. भारती ही जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र पाटील यांची मुलगी आहे.

भारती अभ्यास करायची त्यावेळी तिची ८२ वर्षीय आजी रात्रभर जागून होती. वडिलांची परिस्थिती, लहान भावाचे शिक्षण या सर्व बाबींचा विचार करून कमीत कमी खर्चात शिक्षण घेता यावे यासाठी तिने इंजिनिअरिंग न करता, बी. एस्सी.ला प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेतल्याचे सांगितले. भारतीच्या या यशाबद्दल ग्रामीण भागातून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.