जळगाव लाईव्ह न्यूज । भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील प्राचिन श्री. भैरवनाथ महाराज धार्मिक स्थळास ‘क’ दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली. त्यामुळे यासाठी अपेक्षित निधी उपलब्ध होऊन पुरातन स्थळाचा विकास होण्यास मदत होणार आहे.
नाडगाव येथील श्री. भैरवनाथ महाराज धार्मिक स्थळाचा इतिहास पुरातन असून, समोर पायविहीर आहे. खान्देशचा परिसर पुण्यश्लोक अहिल्याआई होळकर यांच्या अधिपत्याखाली असतांना त्यांनी अनेक शिवमंदिरांचा जिर्णोद्धार व पायविहीरींचे निर्माण केल्याची इतिहासात नोंद आहे. या प्राचिन इतिहासात नाडगाव येथील भैरवनाथ बाबा मंदिराचा संबंध येत असल्याने या स्थळाला विशेष महत्त्व आहे.
तिर्थक्षेत्रांतर्गत ‘क’ दर्जा मिळालेल्या धार्मिक स्थळास १५ लखापर्यंत निधी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येतो. निधीअभावी मंदिर परिसरातील प्राचीन पायविहिरीचे संवर्धन होऊ शकले नाही. तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जा प्राप्त झाल्याने येत्या काळात प्रलंबित असणारी कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेला पाठपुरावा महत्वाचा ठरल्याचे सांगण्यात येत आहे.
तीन देवस्थानास ‘क’ दर्जा :
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तालुक्यातील तीन धार्मिक स्थळांना तीर्थक्षेत्र ‘क’ दर्जा दिला. त्यात नाडगावसह येवती येथील साईबाबा मंदिर व करंजी पाचदेवळी येथील महादेव देवस्थान यांचा समावेश आहे.