अखेर एसटी कामगारांचा बेमुदत संप मागे ; मिळेल 28 टक्के महागाई भत्ता
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला असून एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचं राज्य सरकारकडून मान्य करण्यात आलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी कामगारांचा बेमुदत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
एसटी महामंडळातील श्रमिक संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने दि. २७ ऑक्टोबर, २०२१ रोजी राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने २७ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी आज मंत्रालयात संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडणार आर्थिक भार याचा ऊहापोह करत मंत्री ॲड. परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचे त्यांनी जाहीर केले.
त्या पार्श्वभूमीवर एसटी कामगारांचे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय एसटी कामगार संघटनांनी घेतलाय. या निर्णयानंतर 28 कोटी महागाई भत्ता आणि 2 कोटी घरभाडे असा 30 कोटी रुपयांचा भार एसटी महामंडळावर दरमहिना पडणार आहे. एसटी कामगारांच्या या दोन महत्वाच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र, एसटीचं राज्य सरकारमधील विलिनीकरण करण्याच्या मागणीबाबत निर्णय घेण्यात आला नसल्याचं कळतंय.