⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

बीडच्या दोघांनी वृद्धाला लुटले, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । यावल तालुक्यातील पाडळसे येथील ६८ वर्षीय वृद्धाला रस्ता अडवून लुटणाऱ्या दोन्ही संशयितांना २ मार्चपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. जावेद अली नौशाद अली (वय ४३), जफर हुसेन उर्फ इज्जत हुसेन (वय ३९) असे संशयितांचे नाव आहे. या दोघांना २१ फेब्रुवारीला यावल पोलिसांनी शिरपूर येथून ताब्यात घेतले होते. ओळख परेड साठी पोलिस कोठडीचा हक्क राखून ठेवत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. आता दोघांची ओळख परेड देखील पूर्ण झाली आहे.

पाडळसे येथील दिलीप पुरुषोत्तम बऱ्हाटे हे १३ जानेवारीला सकाळी दुचाकीने यावलला येत होते. घोडे पिरबाबा दर्ग्यापुढे मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी बऱ्हाटे यांना थांबवले. आपण जळगाव येथील पोलिस असून तुमच्याकडे गांजा असल्याचे सांगितले. यानंतर बऱ्हाटे यांची झडती घेताना त्यांच्या हातातील ४० हजार रूपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून पोबारा केला होता. अशाच प्रकारच्या गुन्ह्यात शिरपूर पोलिसांनी अनुक्रमे जावेद अली नौशाद अली (वय ४३), जफर हुसेन उर्फ इज्जत हुसेन (वय ३९, दोन्ही रा.शिवाजीनगर रेल्वे पोलिस कॉलनी, परळी, जि.बीड) या दोघांना अटक केली होती. यावलच्या गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशयावरून यावल पोलिसांनी २१ फेब्रुवारीला दोघांना शिरपूर येथून ताब्यात घेतले होते. यानंतर ओळख परेड साठी पोलिस कोठडी राखून ठेवत दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. ओळख परेड नंतर रविवारी दोघांना यावल न्यायालयात न्यायाधीश व्ही.एस.डामरे यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

भुसावळात ओळख परेड

या दोन्ही संशयितांची शुक्रवारी भुसावळ उपकारागृहात फिर्यादीसमोर ओळख परेड झाली. यावेळी यावलचे सहदंडाधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांची उपस्थिती होती.