⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

Big Breaking : नव्या चिन्हाची तयारी ठेवा… उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । शिवसेनेत उभी फूट पडली असे म्हणण्यापेक्षा शिवसेनाच फुटली आहे. संघटनात्मक बाजू तपासली असता शिवसेनेचे दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदार फुटले आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आहे. शिवसेनेला गळती लागली असून नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी देखील बाहेर पडू लागले आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा गट मूळ शिवसेना आमचीच सांगत शिवसेनेच्या चिन्हावरच हक्क सांगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख यांनी त्यादृष्टीने तयारी सुरु केली असून पक्ष चिन्हाची आशा सोडत नव्या चिन्हाची तयारी ठेवा अशा सूचना राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना दिल्या आहेत.

राज्यातील शिवसेनेत फूट पडली असून एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ४० आमदारांनी भाजपला साथ देत वेगळा गट स्थापन केला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेतील गळती आणखी वाढली आहे. पक्षबांधणीसाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून आजपासून राज्यभरात निष्ठा यात्रा सुरु करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यासोबतच शिवसेना आमचीच असल्याचे सांगण्यास सुरु केले आहे. शिवसेना कुणाची आहे हे तर येणाऱ्या काळात समजणार आहे.

शिवसेनेचे (Shivsena) एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. बंडखोरांचे संख्याबळ पाहता पक्षाचे धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा किंवा ते गोठवण्याचा प्रयत्न होणार आहे. कायदेशीर लढाईत दुर्दैवाने अपयश आले तरी गाफील न राहाता शिवसेनेला जे काही चिन्ह मिळेल ते घरोघरी पोचवण्यासाठी कंबर कसा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केले आहे. १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रेवर ११ जुलैला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court on Shivsena) सुनावणी होणार आहे. या सुनावणीत नेमकी शिवसेना कुणाची याबाबतही स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतली पडझड रोखण्यासाठी आदित्य ठाकरे हे आजपासूनच निष्ठा यात्रेवर निघत आहे. आदित्य ठाकरे हे मुंबईतला प्रत्येक मतदार संघ प्रत्येक शाखा पिंजून काढणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या यात्रेची सुरुवात ही बंडखोर आमदार यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातून म्हणजेच मुंबईतील भायखळ्यातून होत आहे. आदित्य ठाकरे मुंबईतील ठाकरे गटाकडे उरलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आदित्य ठाकरे यांचीही निष्ठा यात्रा फक्त मुंबई पुरती थांबणार नाही, तर आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढण्याचाही प्लॅन आखला आहे. मुंबईनंतर आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघाकडे आपले लक्ष वेधणार आहेत.