बँकेच्या शिपायाने रचला डाव, सव्वातीन कोटींच्या दागिन्यांवर डल्ला
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । भडगाव तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत ग्राहकांनी तारण म्हणून ठेवलेले सोने चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. बँकेतील शिपाईच या चोरीतील मास्टर माईंड होता आणि ३ कोटी १७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्यानंतर त्यानेच गावभर चोरी झाल्याचा डंका वाजवला. भडगाव पोलीस आणि एलसीबीच्या पथकाने अवघ्या काही तासात गुन्हा उघडकीस आणला असून तिघांच्या मुसक्या आवळल्या आहे. चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या शेतात सोने लपविले होते.
भडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक उतेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, सहाय्यक फौजदार कैलास गिते, पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास पाटील, नितिन राउते, पोलीस नाईक किरण पाटील, ज्ञानेश्वर महाजन, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अशोक महाजन, विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, पोलीस नाईक राहुल पाटील, रणजित जाधव, प्रीतम पाटील, किशोर राठोड, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील, ईश्वर पाटील, उमेश गोसावी, श्रीकृष्ण देशमुख आदींच्या पथकाने तपासचक्रे फिरवीत राहुल अशोक पाटील (वय-२४), विजय नामदेव पाटील (वय ३९), बबलु उर्फ विकास तुकाराम पाटील (वय-३७, तिघेही रा.आमडदे ता.भडगांव) यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
भडगाव तालुक्यातील आमडदे येथे शाखा असून याठिकाणी मॅनेजरसह तीन कर्मचारी नियुक्तीस आहेत. या बँकेत दि.२२ रोजी रात्री १ ते २.३० वाजेच्या सुमारास चोरी झाल्याची माहिती बँकेतीलच शिपाई राहुल अशोक पाटील यानेच गावकऱ्यांना चोरी झाल्याची माहिती दिली. बँकेतील सर्व दागिने लंपास झाल्याने पोलीस यंत्रणा लागलीच कामाला लागली. भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळी चोरी करताना चोरांकडून बँकेचे कुलुप तोडणे, तिजोरी फोडणे, लॉकर तोडणे असा प्रकार करण्यात आलेला नव्हता, तसेच रोख रक्कमही आहे त्याच स्थितीत होती त्यामुळे या चोरीच्या घटनेत बँकेतीलच कर्मचार्यांचा सहभाग असावा, असा संशय पोलिसांना आला. घराच्या शेजारीच राहणारा कर्मचारी राहुल पाटील याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला खाक्या दाखविताच त्याने चोरी कबूल करीत साथीदारांची नावे देखील सांगितली.
दोन शेतात लपविले होते सोने
पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशीत त्यांनी चोरी केलेले सोने एका संशयिताच्या आमडदे शिवारातील जोगडाकडील शेतात व आंचळगाव रस्त्याकडील शेतात खड्डा करुन लपविले असल्याची कबुली दिली व त्या ठिकाणावरून पोलिसांना पाच किलो सोन्याचे दागिने काढून दिले. बँकेचे व्यवस्थापक तन्मय देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३ कोटी १७ लाख ७९ हजार ८५० रुपयाचे ३ किलो ६५५.९७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १० हजारांचा सीसीटीव्ही कॅमेरा आणि डीव्हीआर, मेन गेटला लावलेले २०० रुपयांचे कुलूप असा ३ कोटी १७ लाख ९० हजार ५० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.