जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या अनेक दिवसापासून केळी दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असताना आता बाजारात केळीचे दर वाढू लागले आहेत. २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत खाली आलेले दर आता ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. सध्या काहीसा भाव वाढला असला तरी केळी बागांमध्ये मालच नाही. मागणी वाढल्याने आता व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात येत आहेत.

मागच्या तीन चार महिन्यापासून केळी दरात मोठी घसरण झाल्याचं दिसून आले. लाखो रूपये खर्च करूनही हाती काही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचं मोठे आर्थिक नुकसान झाले. बोर्डावर चांगला भाव असला तरी व्यापारी कमी दरात केळी खरेदी आहे. काही दिवसांपासून केळीला अवघा २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळत आहे. केळी अतिशय कमी दर मिळाल्यामुळे बहुतांश केळी उत्पादक शेतकऱ्यांनी नाइलाजाने केळीच्या बागा काढून टाकल्या. मात्र आता दरात सुधारणा झाली आहे. सध्या केळीचे दर ६०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.

थंडीमुळे उत्तर भारतात जरी केळीची मागणी थोडी घटली असली तरी राजस्थान आणि मुंबई सारख्या महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये केळीची मागणी कायम आहे. सध्या मागणी वाढली असून, दुसरीकडे आवक घटली आहे. यामुळे दरात काहीशी वाढ झाली.
गेल्या काही दिवसापासून केळी विक्रीसाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे फिरावे लागत होते, मात्र आता चित्र पूर्णपणे बदलले आहे. मागणी वाढल्यामुळे आता व्यापारीच केळी उत्पादकांकडे खरेदीसाठी घिरट्या घालत आहेत. मागणी वाढल्यानं व्यापारी वर्गाने येत्या काही दिवसांत केळीच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.






