जळगाव लाईव्ह न्यूज । काही दिवसापूर्वी केळीला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता केळीचे दर पुन्हा कोसळले आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांकडे होणारी फळांची निर्यात थांबल्याचा मोठा फटका केळी उत्पादकांना बसत आहे.

निर्यात बंद पडल्याने मोठ्या प्रमाणावर केळी व इतर फळे स्थानिक बाजारात दाखल होत असून, यातच सण-उत्सव संपल्याने केळी भावात मोठी घसरण झाली आहे. सध्या केळीचे दर प्रतिक्विंटल ४५० ते ५०० रुपयांदरम्यान घसरले असून यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तापत्या उन्हामुळे उत्पादन वाढले असताना उत्तर भारतात अवकाळी पावसामुळे मागणीत घट झाली आहे. तसेच रमजान ईद व नवरात्र उत्सव संपल्यानंतर बाजारातील उठावही कमी झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सोलापूर परिसरातील निर्यातक्षम केळी माल स्थानिक बाजारात कमी दरात उपलब्ध होत असल्याने व्यापारीवर्ग तिकडे वळला आहे. त्यामुळे खान्देशातील केळीला अपेक्षित दर मिळत नाहीत.
बऱ्हाणपूर येथील केळी लिलाव बाजारातही पूर्वीसारखी स्पर्धा राहिलेली नसून व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व्यवहार करत असल्याची तक्रार शेतकरी वर्गातून होत आहे. त्यामुळे लिलाव प्रक्रियेवरील विश्वास कमी होत असल्याचे चित्र आहे. याशिवाय, नेपाळकडे होणारी निर्यात गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प झाली असून यावर तोडगा काढण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकरी व व्यापाऱ्यांकडून होत आहे. सध्या भाव कोसळल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.







