⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 12, 2024
Home | कृषी | यंदाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार शेतकरी हेमचंद्र पाटील यांना जाहीर

यंदाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार शेतकरी हेमचंद्र पाटील यांना जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। २६ जुलै २०२३। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २०२३ चा राज्य पातळीवरील प्रतिष्ठेचा कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार पंचक (ता. चोपडा) येथील प्रगतिशील शेतकरी हेमचंद्र पाटील यांना जाहीर झाला आहे.

दोन वर्षांपासून विद्यापीठाने राज्य पातळीवरील कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार सुरू केला आहे. या वर्षीचा हा पुरस्कार कृषी क्षेत्रासाठी जाहीर झाला होता. त्यासाठी विद्यापीठाने प्रस्ताव मागविले होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी या पुरस्कार निवडीसाठी जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. ११ ऑगस्टला विद्यापीठ नामविस्तार दिनी हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष व कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मायी आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा मुंबई विद्यापीठाच्या जैवशास्त्र विभागाचे प्रा. संजय देशमुख यांचा या समितीत समावेश होता. समितीने पंचक गावातील प्रगतिशील शेतकरी हेमचंद्र दगाजी पाटील यांच्या निवडीची शिफारस केली असून, कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी ही शिफारस मान्य केली आहे.

५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ११ ऑगस्टला माजी कुलगुरू प्रा. आर. एस. माळी यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. याच समारंभात विद्यापीठ स्तरावरील उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, संशोधक यांना पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह