जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । गल्लीत सुरु असलेल्या भजनाच्या कार्यक्रमात जानकी दामोदरम यांना मंदिराची कल्पना सुचली आणि त्यांनी ती उपस्थित सर्व महिलांशी चर्चा केली. सर्वांचे एकमत झाले आणि अवघ्या २५ महिलांच्या पुढाकाराने दोन वर्षात भव्य अय्यप्पा स्वामी मंदिर साकारण्यात आले. जळगावातील हायवे दर्शन कॉलनीत निवृत्ती नगर येथे असलेले अय्यप्पा स्वामी मंदिर समस्त जळगावकरांना कार्तिक स्वामी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. कैरळी महिला ट्रस्ट संचालित श्री अय्यप्पा स्वामी मंदिराची उभारणी २५ महिला आणि त्यांच्या परिवाराच्या सहकार्याने झाले आहे.
मूळ केरळचे रहिवासी असलेले काही केरळी कुटुंब जळगाव शहरात उदरनिर्वाहसाठी आले होते. जळगावात आपल्या संसाराचा गाडा रुळावर आल्यानंतर १९९८ मध्ये जानकी दामोदरन यांच्या घरी भजनाचा कार्यक्रम होता. भक्तिमय वातावरणात तल्लीन असताना अचानक एक विचार त्यांच्या मनात आला. आपल्या शहरात अय्यप्पा स्वामींचे मंदिर असावा असा विचार त्यांनी बोलून दाखविला. भजनाला आलेल्या सर्व महिलांनी त्यांना होकार दिला तर सती दामोदरन आणि शुबा वेणुगोपालन यांच्या पुढाकाराने त्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला.
सुरेशदादांच्या प्रयत्नाने मिळाली जागा आणि सुरु झाली धावपळ
मंदिर उभारणीच्या कार्यात २५ केरळी महिला कुटुंबासह पुढे आले. मंदिर तर उभारायचं पण जागा कुठे मिळणार? हा मोठा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. जिल्ह्यातील तत्कालीन मंत्री सुरेशदादा जैन यांच्या भेटीला सर्व पोहचले. मंदिरासाठी दोन वर्ष पाठपुरावा केल्यानंतर जळगाव मनपात सत्ता असल्याने सुरेशदादा जैन यांनी मनपाच्या माध्यमातून संस्थेला हायवे दर्शन कॉलनीत २५ हजार स्क्वेअर फूट जागा दिली. मंदिरासाठी जागा मिळाल्यानंतर खरी धावपळ सुरु झाली.
३०० मल्ल्याळम कुटुंबियांनी घेतले परिश्रम
मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाल्यानंतर आजच्या अध्यक्षा वसंती अय्यर यांचे पती हरिहर अय्यर हे तेव्हा नुकतेच शासकीय सेवेतून अभियंता म्हणून निवृत्त झाले होते. त्यामुळे त्यांनी मंदिराच्या बांधकामाची जबाबदारी स्विकारली. मंदिराची मोजणी व डिझाईन तयार करायला सुरवात झाली आणि हे कार्य हरिहर अय्यर यांनी मोफत करण्याचे ठरविले..पुन्हा नवा प्रश्न उभा राहिला. मंदिराच्या निर्माणासाठी लागणारी साधनसामुग्री आणायची कुठून असा प्रश्न होता. २५ महिलांनी अगोदर पैसे जमा केले त्यानंतर एक-एक करता मंदिर पूर्ण होईपर्यंत ३०० मल्याळम कुटुंबीय जमले आणि त्यांनी मंदिराच्या उभारणीसाठी आर्थिक हातभार लावला.
महाबलीपूरम येथून मागवली मूर्ती
तामिळनाडूमध्ये असलेले महाबलीपुरम मूर्ती बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. अय्यप्पा स्वामींची मूर्ती आणण्यासाठी सर्वांनी प्रत्येकी ५ हजारांची देणगी जमा केली. दामोरन व हरिहर हे महाबलीपूरमला जाऊन मूर्ती तयार करण्याचे सांगून आले. तोवर इकडे अवघ्या ५ मंदिर पूर्णरुपास आले. अय्यप्पा स्वामींचे केरळच्या कोट्टयम जिल्ह्यात असलेल्या तंथलम गावातील मंदिर फार प्रसिद्ध आहे. जळगावात देखील त्याच मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिरात अय्यप्पा स्वामींच्या मुर्तीसह तामिळनाडूतील प्रसिद्ध मधुराई मीनाक्षीची मूर्ती आणि केरळच्या गुरुवायूर येथील विष्णू मंदिरातील भगवान विष्णूची हुबेहूब प्रतिमा आपल्याला जळगावात पहावयास मिळते.
चार दिवस रंगला प्राणप्रतिष्ठापना सोहळा
अय्यप्पा स्वामी, मधुराई मीनाक्षी, कार्तिक स्वामी आणि भगवान विष्णूच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त जानेवारी २००० ठरला. मूर्ती आणल्यानंतर मोठ्या भांड्यात पाणी व तांदूळ टाकून त्यात मूर्ती ३ दिवसासाठी ठेवण्यात आल्या. २६ जानेवारी २००० रोजी मूर्ती पाण्यातून बाहेर काढत तिची पूजा अभिषेक करण्यात आल. संपूर्ण दाक्षिणात्य पद्धतीने करण्यात आलेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी भटजी देखील तामिळनाडू मधून बोलाविण्यात आले होते.
कार्तिक स्वामी होते विवाहित, दरवर्षी पौर्णिमेला होते भाविकांची गर्दी
तामिळनाडूमध्ये कार्तिकस्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहे. कार्तिकस्वामी हे ब्रम्हचारी असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे परंतु या मागचं सत्य वेगळेच आहे. कार्तिकस्वामी हे ब्रम्हचारी नसून त्यांना दोन पत्नी आहेत. एकीचे नाव वल्ली तर दुसरीचे नाव देवयानी असल्याची माहिती वसंती हरिहर यांनी दिली. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात अभिषेक करून हरभऱ्याच्या उसळीचा नैवद्य केला जातो. मंदिरात गुळ, केळ, मध, खडीसाखर, तूप मिळून पंचामृत केले जाते. हे पंचामृत कोयम्बतूरजवळ असलेल्या गावात प्रसिद्ध असलेल्या कार्तिकस्वामींच्या मंदिरात दिले जाते. या पंचामृतचा अभिषेक केल्यानंतर भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येते
मंदिरात होतात तीन प्रकारचे अभिषेक
मंदिरात तीन प्रकारचे अभिषेक केले जातात त्यात धन अभिषेक, सोनं अभिषेक आणि चांदी अभिषेक असे प्रकार आहे. धन अभिषेक म्हणजे लोकांकडून पैसे व चिल्लर मागून कार्तिकस्वामींचा अभिषेक केला जातो व हेच पैसे प्रसाद म्हणून पुन्हा भाविकांमध्ये वाटले जातात. त्यानंतर मंदिरात भाविकांनी दान केलेल्या सोन्याने देवाचा अभिषेक केला जातो व त्यानंतर चांदीच्या अभिषेकसाठी १०८ नाणे चेन्नईहून मागविले जातात. त्याचा अभिषेक करण्यात येतो.
वर्षभर होतात विविध धार्मिक उत्सव
एका महिन्यात येणाऱ्या २ प्रदोषला दिवसाला शिवशास्त्र नाम वाचुन बेल अर्पण केले जातात. दोन एकादशींना विष्णूसहस्त्र नाम वाचून तुळस अर्पण केली जाते. चतुर्थीला गणपती शास्त्र वाचून लाल फुल अर्पण केले जातात. नोव्हेंबर महिन्यात दि.१५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान अय्यप्पा स्वामींचे मंडळ असते. महिन्याभराच्या काळात दररोज महाआरती करून भाविकांना प्रसाद देण्यात येतो.
नऊ मंदिरांची सांगड
कैरळी महिला ट्रस्ट संचालित श्री अय्यप्पा स्वामी मंदिरात केवळ एक नव्हे तर ९ लहानमोठी मंदिरे आहेत. त्यात अय्यप्पा स्वामी मंदिर, गणपती मंदिर, मधुराई मीनाक्षी, गुरुवायूर मंदिर, हनुमान मंदिर, शिवलिंग मंदिर, कार्तिकस्वामी मंदिर, नागदेवता मंदिर, नवग्रह मंदिर असे सगळे दर्शन एकाच ठिकाणी साऊथ इंडियन पद्धतीने करायला मिळतात.
पहा खास व्हिडीओ:
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1282131758970254