⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या : रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

जळगाव लाईव्ह न्युज | रेल्वे विशेष | राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशात कोरोनाची लाट आली असून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता नागरिकांना रेल्वे प्रवासावेळी मास्क घलणे अनिवार्य असणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना बाधितांचा आलेख हा झपाट्याने वाढत आहे. राजधानी दिल्लीसह काही राज्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र वाढत्या कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार सातत्याने कठोर पावले उचलत आहे. आता भारतीय रेल्वेने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्या नुसार सर्वात मोठा निर्णय हा रेल्वे प्रवासावेळी प्रवाशांना मास्क घालणे अनिवार्य असणार असल्याचा आहे.

रेल्वे बोर्डाच्या कार्यकारी संचालक निरज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व झोनच्या मुख्य व्यवस्थापकांना पत्रकाद्वारे याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत रेल्वे मध्ये प्रवास करताना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मास्क न लावल्यास संबंधित प्रवाशांवर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. यामुळे सर्व प्रवाशांनी यापुढे रेल्वे प्रवासादरम्यान मास्क घालणे आवश्यक आहे.

रेल्वे प्रवाशांसोबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील रेल्वे परिसरात मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतची जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे.