⁠ 
सोमवार, मे 6, 2024

भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेच्या पाचही आमदारांचे पंख छाटण्याचे प्रयत्न?

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२३ । आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुक लक्षात ठेवून भारतीय जनता पक्षाने आपली तयारी सुरू केली आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून नुकतंच विधानसभा निहाय निवडणूक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. 2019 च्या निवडणुकीत ज्या ज्या लोकांनी शिवसेने विरुद्ध बंडखोरी केली होती अशांना ही पद देण्यात आली आहेत. यामुळे भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या आमदारांचे पंख छाटण्याचे काम करत आहे की काय? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे

याचे कारण म्हणजे जळगाव ग्रामीण जो पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा मतदारसंघ आहे. या ठिकाणी बंडखोरी केलेल्या चंद्रशेखर अत्तरदे यांना जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख पद देण्यात आले आहे. तर दुसरीकडे अमोल शिंदे यांनी पाचोरा मधून किशोर पाटील यांच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यांना भारतीय जनता पक्षाने पाचोरा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. दिलेल्या या जबाबदारीमुळे शिंदे गटातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ज्या मतदारसंघात सद्यस्थितीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत त्या ठिकाणी भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख नेमले आहेत. यामुळे भाजप निवडणूक लढवली की काय ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. जर मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा, चोपडा या जागा भाजपच्या मित्र पक्षाच्या आहेत. तर भाजपकडून या ठिकाणी निवडणूक प्रमुख देण्यात आल्या तरी का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाने केलेल्या नियुकत्या हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवायचा असतो. भारतीय जनता पक्षालाही स्वतःचा पक्ष वाढवायचा आहे. त्यासाठी त्यांनी या नियुक्त केल्या आहेत. मात्र या नियुक्त्यांचा आणि येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकांचा काहीही संबंध नाही. येणाऱ्या निवडणुका या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकजुटीने लढणार आहे. एकत्र लढणार आहे. युतीमध्ये लढणार आहेत. यामुळे या नियुक्त्यांचा निवडणुकीमध्ये कोणताही परिणाम दिसणार नाही.

तर दुसरीकडे या विषयावर भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार स्मिता वाघ म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती ही अभेद्य आहे. या नियुक्तींचा आणि येणाऱ्या होणाऱ्या निवडणुकांचा विपर्यास करण्याची गरज नाही. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. येत्या निवडणुका आम्ही एकत्रच लढवणार आहोत.