जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । यावल शहरातील कापड दुकानदारावर केवळ नाइट पँट बदलून देण्याच्या कारणावरून हल्ला करण्यात आला. यात दोन जण जखमी झाले आहेत. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी येथील पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तर हल्ल्यात जखमी झालेल्या दुकानदारावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारांसाठी जळगावला हलवले. दरम्यान हल्ल्याच्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शहरात तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या व्यापारी संकुलात राहुल मधुकर बडगुजर यांचे परिधान कलेक्शन हे कापड दुकान आहे. या दुकानातून समीर रशीद कच्छी, रा. यावल याने आठ दिवसांपूर्वी नाइट पँट खरेदी केली होती. ती फाटल्याने गुरुवारी तो ती पँट बदलून द्यावी यासाठी दुकानात आला. मात्र अशाप्रकारे फाडून आणलेली पँट बदलून देता येत नाही व त्याची गॅरंटी नसते, असे बडगुजर यांनी सांगितले. मात्र त्याचा राग अाल्याने समीर कच्छी हा ती पँट दुकानात फेकून निघून गेला. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास समीर कच्छी हा अब्दुल रशीद कच्छी, यासिन कच्छी व इतर दोन जण हातात लाकडी दांडे घेवून दुकानात आले. त्यांनी दांडक्याने मारून राहुल बडगुजर यांच्या डोक्यास जबर दुखापत व मारहाण केली. तसेच दुकानात असलेला त्यांचा लहान भाऊ अक्षय उर्फ चंद्रकांत बडगुजर यासही गालावर मारून दुखापत तसेच दुकानातील साहित्याची नासधूसही केली.
या दरम्यान त्यांच्या खिशातील ३० हजारांची रोकडही कुठे पडली किंवा कोणीतरी लांबवली. शेजारी दुकानदारांनी धाव घेत जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉ.शुभम तिडक यांनी प्रथमोपचार केले. जखमी राहुल बडगुजर यांस डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यास जळगावला पाठवले. पोलिसांनी जखमीचा जबाब नोंदवत दोन जणांना ताब्यात घेतले. रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.