जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । किनगाव येथील आत्माराम नगरात एकट्या राहणाऱ्या ७५ वर्षीय महिलेवर भामट्याने हल्ला करून हातातील दोन चांदीचे कडे हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेजारी महिलेची चाहूल लागताच भामटा पसार झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी महिलेस जळगावला हलवण्यात आले.
भामटा साहित्य सोडून पसार यावल तालुक्यातील किनगाव येथील मराबाई सखाराम कोळी या एकट्याच राहतात. सोमवारी रात्री एका अज्ञात भामट्याने घरात प्रवेश करून मारहाण करत मराबाईंना बेशुद्ध पाडले. यानंतर तिच्या हातातील चांदीचे एक कडे काढले. दुसरे कडे काढत असताना शेजारील महिलेची चाहूल लागताच हा भामटा आपले साहित्य सोडून पसार झाला. हा प्रकार नजरेस पडताच शेजारील महिलांनी संजय सयाजीराव पाटील यांना माहिती दिली. यानंतर संजय पाटील, बबलू कोळी, पप्पू विनायक पाटील, डॉ. योगेश पालवे, किरण महाजन, संजय वराडे यांनी जखमी महिलेस तातडीने किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. तेथे डॉ. योगेश पालवे, अधिपरीचारिका प्रियंका महाजन यांनी प्राथमिक उपचार करून महिलेस जळगाव येथे हलवले. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आशित कांबळे हे घटनास्थळी आले. डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांनी देखील भेट दिली.