⁠ 
शनिवार, जून 15, 2024

चित्रा चौकात भरदुपारी चारचाकीची काच फोडून बॅग लांबवली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२३ । जळगांव शहरातील चित्रा चौकात जेवणासाठी आलेल्या व्यापाऱ्यांच्या कारची काच फोडून बॅग चोरी केल्याची घटना सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

शिरपूर येथील फर्टीलायझर विक्रीचा व्यवसाय असलेले जितेंद्र शालीग्राम भदाणे हे एका मित्रासह जळगांवमार्गे चारचाकी क्रमांक एमएच.१८.बीसी.०२५७ ने जामनेर जात होते. दुपारी १२.४० च्या सुमारास चित्रा चौकात असलेल्या एका फर्टीलायझर दुकानाच्या बाहेर त्यांनी कार उभी केली आणि जेवणासाठी जवळच्या हॉटेलमध्ये गेले. दोघे जेवण करुन १.१५ वाजता परत आले असता त्यांना मागील दरवाज्याची काच फुटलेली दिसून आली.

कारमध्ये डोकावून पहिले असता मागील सीटवर ठेवलेली बॅग त्यांना दिसून आली नाही. दोघांनी तात्काळ शहर पोलिसात धाव घेत पोलिसांना माहिती दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देउन सर्व जाणून घेतले. बॅगमध्ये १० हजारांची रोकड आणि महत्वाचे दस्तऐवज होते. भरदिवसा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घटना घडल्याने पोलीस कुठे होते असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.