जळगाव जिल्हा

जळगाव ‍परिमंडलात वर्षभरात वीजचोरीची तब्बल इतके प्रकरणे उघडकीस

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२३। महावितरणच्या जळगाव परिमंडलात गेल्या वर्षभरात वीजचोरीची 11794 प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात ग्राहकांनी 23 कोटी 9 लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 88 प्रकरणांत वीजचोरी करणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महावितरणतर्फे जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात सातत्याने वीजचोरीविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. यात आकडा टाकून वीजचोरी करणाऱ्यांसह मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. जळगाव परिमंडलात एप्रिल -2022 ते मार्च-2023 या आर्थिक वर्षात मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. यात जळगाव मंडलात 8196, धुळे मंडलात 2147 तर नंदुरबार मंडलात वीजचोरीची 1451 प्रकरणे उघडकीस आली. एकूण 11794 प्रकरणांत ग्राहकांना 23 कोटी 9 लाख रुपयांच्या वीजचोरीची बिले देण्यात आली.

यातील 3425 ग्राहकांकडून वीजचोरीच्या बिलांची 8 कोटी 65 लाख रुपयांची रक्कम महावितरणने वसूल केली आहे. ज्या ग्राहकांनी वीजचोरीची बिले भरलेली नाहीत, त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया महावितरणतर्फे सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जळगाव मंडलात 17, धुळे मंडलात 61 तर नंदुरबार मंडलात 10 प्रकरणांत वीजचोरांवर पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वीजचोरीविरोधातील धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. नागरिकांनी अधिकृत जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Related Articles

Back to top button