जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला आणखी एक हादरा; जवळची व्यक्ती सोडणार साथ

सप्टेंबर 12, 2025 4:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२५ । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जोरदार तयारीला लागला असून पक्षाचे वरिष्ठ नेते राज्यभर दौरे करत बैठका घेत आहेत. मात्र शरद पवार गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अशातच आता जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला आणखी एक हादरा बसला आहे. कारण शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी शरद पवारांची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

sharad pawar jpg webp

लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडली होती. पक्षाला लागलेली ही गळती अजूनही सुरूच आहे. पक्षाचे अनेक बडे नेते शरद पवारांची साथ सोडत आहे. अशातच आता विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी हे देखील शरद पवार गटाला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत.

पण अद्याप पक्ष सोडण्याबाबत कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे सांगतानाच आपण राजकारणातून हळूहळू बाहेर पडणार असल्याचे अरुणभाई गुजराथी यांनी सांगितले. नुकतीच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शरद पवार गटाची जळगाव जिल्ह्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे जिल्ह्यातील अनेक बडे नेते उपस्थित होते. पण या बैठकीला अरुणभाई गुजराथी आले नव्हते त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या. तेव्हापासूनच ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. ते कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा देखील सुरू आहे. पण त्यांनी आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याचे सांगितले.

अरुणभाई गुजराथी यांनी सांगितले की, ‘मी सर्व बैठकांमध्ये चांगल्या पद्धतीने उपस्थित राहायचो. काल मी उपस्थित नव्हतो ही वस्तुस्थिती आहे. त्यातून काही लोकांनी मी भाजप, अजितदादा गटात जाणार असल्याची चर्चा केली. मी आता हळहळू राजकारणातून निवृत्त होणार आहे. माझे वय ८५ वर्षे झाले आहे. मला कोणतीही निवडणूक लढवायची नाही किंवा नियुक्तीने कोणतीही जागा मिळवायची नाही. मला शरद पवारांनी खूप मोठे केले. मी माझ्या नेत्याला कसं सोडणार, त्यांच्या बद्दलची कृतज्ञता कायम राहिल. माझ्याकडील कार्यकर्त्यांची फळी अजित पवार गटात जाण्याकडे कल आहे. त्या दृष्टीने त्यांना काही निर्णय घ्यायचे आहे. त्यांना आता जि.प, नगरपालिका, निवडणुका लढवायच्या आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांचा उत्तराई म्हणून त्यांचे काम मला करावे लागेल अशी माझी इच्छा आहे. कार्यकर्त्यांना मी सोडू शकत नाही, हे देखील सत्य आहे. या निवडणुकांनंतर मी स्वत: राजकारणापासून अलीप्त होऊन जाईल.’

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now