जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२४ । राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन) सन २०२४-२५ मध्ये अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यात येतो. अनुसूचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेणेसाठी दिनांक २५ऑक्टोबर ते १०डिसेंबर२०२४ या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्या करीता मोहीम राबविण्यात येत आहे.
राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन) योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक यांना ५५ टक्के व बहुभूधारक यांना ४५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने अंतर्गत अतिरिक्त २५ टक्के व ३० टक्के पुरक अनुदान देणेबाबत तरतुद करण्यात आलेली आहे. अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजने अंतर्गत पुरक अनुदान देय असल्याने पात्र शेतकऱ्यांना मंजुर मापदंडाच्या ९० टक्के च्या मर्यादेत अनुदान देण्यात येते.
सन २०२४-२५ मध्ये नाशिक विभागासाठी अनुसुचित जाती प्रवर्गाकरिता रक्कम रु. ४८५ लाख व अनुसुचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ देणेकरीता रक्कम रु. १८५६ लाख निधी जिल्हास्तरावर उपलब्ध आहे. अर्ज नोंदणी करण्यासाठी दिनांक २५ ऑक्टोबर ते १०डिसेंबर या कालवधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अनु. जाती व अनु. जमातीच्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या कालवधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे. अर्ज करतांना अचूक माहिती भरावी जेणेकरून अर्ज रद्द होणार नाही. जास्तीत जास्त शेतकरी यांनी अर्ज नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सुभाष काटकर यांनी केलेले आहे.
अर्ज करतांना मालकीचा ७/१२, ८अ, आधार कार्ड व बँक पासबुक सोबत असणे आवश्यक आहे. याकरिता आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक असणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर असावी, नोंद नसल्यास विहीर, शेततळे इ.बाबत स्वंय घोषणापत्र देण्यात यावे. योजनेचा लाभ ५ हेक्टर पर्यंत देण्यात येणार आहे. अर्जाची महाडीबीटी पोर्टलवर संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे व निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना लघु संदेशाद्वारे त्यांची माहिती देण्यात येणार आहे. पूर्वसंमती मिळाल्यानंतर नोंदणीकृत कंपनीचे अधिकृत वितरकांकडून संच खरेदी करता येईल. संच बसविल्यानंतर कृषि पर्यवेक्षकामार्फत मोका तपासणी होऊन शेतकरी यांचे बँक खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व सामान्य सेवा केंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन नाशिक विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. सुभाष काटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.