जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी भाजप महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासाठी थांबण्याचा निर्णय घेतला असून एकंदरीत चौधरी यांनी महाजन यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात कमालीची खळबळ उडाली असून, आता निवडणुकीचे चित्र अधिक रंजक बनले आहे.

आज पत्रकार परिषदेत बोलताना अनिल चौधरी यांनी या मोठ्या निर्णयामागचे पडद्यामागील राजकारण स्पष्ट केले. ते म्हणाले, “सुरुवातीला मला भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला होता. त्यानंतर काल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांनी फोन करून मला थांबण्याची विनंती केली. नंदकिशोर महाजन हे माझे मित्रच आहेत, त्यामुळे नेत्यांच्या आदेशाचा आणि मैत्रीचा मान ठेवून मी हा निर्णय घेतला आहे.”

लवकरच शिवसेनेत जाहीर प्रवेश!
या पत्रकार परिषदेला विशेष उपस्थित असलेले आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी मोठी घोषणा केली. आ. पाटील म्हणाले, “आमदार बच्चू कडू यांच्यावर सध्या विदर्भाची जबाबदारी आहे. त्यांनी काल अनिल चौधरी यांच्याशी चर्चा केली आणि मलाही जळगावात समन्वय साधण्यास सांगितले. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्या आदेशानुसार मी आज चौधरी यांची भेट घेतली. अनिल चौधरी यांनी महायुतीला पाठिंबा दिला असून, लवकरच त्यांचा शिवसेनेत (शिंदे गट) अधिकृत प्रवेश होणार आहे.”
पत्रकार परिषदेला प्रमुख नेत्यांची उपस्थिती
निवडणुकीच्या ऐन पूर्वसंध्येला झालेल्या या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेला आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, नगरसेवक बबन पोकळे यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्या (दि. १८) रोजी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य प्राधिकरणासाठी मतदान पार पडणार असून, अनिल चौधरी यांच्या या ऐनवेळच्या माघारीमुळे महायुतीचे पारडे जड झाल्याचे चित्र आहे.








