गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेने वाचले अकरा वर्षीय बालिकेचे प्राण
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२१ । जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णलयात अत्यंत गंभीर स्वरुपात दाखल झालेल्या अकरा वर्षीय बालिकेला वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. या कोरोना सदृश लक्षणे असलेल्या बालिकेस सुमारे चार खासगी रुग्णालयात उपचार न मिळाल्याने तिच्यावर याठिकाणी शस्त्रक्रीया करुन जीवदान देण्यात वैद्यकीय पथकाने यश मिळाविले आहे. तब्ब्ल २९ दिवसाच्या औषधोपचारानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला शनिवार, १२ जून रोजी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला. बालिकेच्या कुंटूंबीयांनी अधिष्ठात्यांसह डॉक्टरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.
यावल तालुक्यातील किनगाव येथील सर्वसामान्य कुटुंबातील ११ वर्षीय बालिकेचे पोट दुखत असल्यामुळे तिला चार खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंरतु, कोरोना सदृश्य लक्षणे असल्यामुळे तसेच तिचा त्रास कमी होत नसल्यामुळे तिला १४ मे रोजी सायंकाळी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बालरोग व चिकित्सा विभागात दाखल करण्यात आले. यावेळी बालिकेची प्रकृती अंत्यत गंभीर होती.
सुरुवातीला वैद्यकीय पथकाकडून तिची सोनोग्राफी करण्यात आली त्यात ॲपेडिक्सवर सूज असल्याचे निष्पन्न झाले. तसेच पोटात पाणी आणि पस असल्यामुळे तिच्या तत्काळ सर्व चाचण्या करण्यात आल्या. रात्री शल्यचिकित्सा विभागात १२.३० वाजेच्या सुमारास तिच्यावर ॲपेडिक्सची शस्त्रक्रीया करण्यात आली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत तिच्या पोटातील आणि आतड्रयाना चिटकलेली पस काढण्यात आली. काही दिवसानंतर तिच्या डाव्या फुफ्फुसात देखील पाणी असल्याचे निर्दशनास आले. हे पाणी सोनोग्राफीच्या मदतीने काढण्यात आले. औषधोपचार आणि फीजीओथेरपीद्वारे तिच्यावर बालरोग विभागाच्या निगराणीखाली यशस्वी उपचार झाले. बालिकेला शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत देवरे, डॉ.विलास मालकर, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोसे, डॉ. अतुल गाजरे, डॉ. निलांजना गोयल, डॉ. विपीन खडसे आदी उपस्थित होते.
या बालिकेवर बालरोग व चिकित्सा विभाग, शल्यचिकित्सा विभाग, बधिरीकरण शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उपचार झालेत. उपचारासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनाखालीवैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत देवरे, डॉ.संगीता गावीत, बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोसे, डॉ. गिरीश राणे, डॉ. अतुल गाजरे, डॉ. निलांजना गोयल, डॉ.शिव जनकवडे, डॉ विश्वा भक्ता, बधिरीकरण शास्त्र विभाग डॉ. संदीप पटेल, डॉ. स्वप्नील इंकने, डॉ स्वाथी एम, विभागातील इंचार्ज परिचारिका संगीता शिंदे इतर परिचारिका, कर्मचारी वृंद आदींनी परिश्रम घेतले.