⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 27, 2024
Home | राष्ट्रीय | अमृत महोत्सव लेखनमाला : सावरकरांचे शिष्य; मदनलाल धिंग्रांद्वारे लंडनपर्यंत पोहोचलेल्या क्रांतीची ज्वाला

अमृत महोत्सव लेखनमाला : सावरकरांचे शिष्य; मदनलाल धिंग्रांद्वारे लंडनपर्यंत पोहोचलेल्या क्रांतीची ज्वाला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सशस्त्र क्रांतीची सुवर्णांकित पाने भाग- ७

भारतमातेला पारतंत्र्याच्या साखळीत अडकून ठेवणारे, ब्रिटीश प्रशासकांच्या विरोधात सशस्त्र क्रांतीची आग इंग्लंडपर्यंत पोहोचली. भारतीयांवर केल्या जाणाऱ्या अत्याचारांचे मूळ वास्तविकतेत इंग्लंडच्या राजधानीत; लंडनमध्येच होते. भारत आणि भारतीयत्वाला सशक्तपणे दाबून, संपवून टाकण्यासाठी आणि इंग्रजांच्या सत्तेला मजबूत करण्यासाठीच इंग्रज प्रशासक, प्रशासकीय अधिकारी आणि सैन्य तसेच पोलीस अधिकरी इत्यादी लंडनमधूनच प्रशिक्षण घेऊन यायचे आणि १५-२० वर्षांपर्यंत भारतीयांवर वेगवेगळे जुलूम केल्यानंतर परत लंडनमध्ये जाऊन आपले उर्वरित आयुष्य ऐश-ओ-आरामात जगायचे.

या अत्याचारी इंग्रजांना त्यांच्या घरात शिक्षा देण्याकरिता भारतीय देशभक्त तरुण तयार झाले. लंडनमध्ये शिक्षण घेणारे कित्येक तरुणांनी सशस्त्र क्रांतीची ज्योत जागवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. काही हुशार आणि कुशाग्र बुद्धी असणारे शिवाय कुशल संघटनकर्त्या विद्यार्थ्यांनी आपले समग्र जीवन या पवित्र कार्यात अर्पित करण्याचा दृढ निश्चय करून लंडन येथे सशस्त्र क्रांतीचा श्रीगणेश केला. श्यामजी कृष्ण वर्मा, रासबिहारी बोस, अरविंद घोष, लाला हरदयाल, सेनापती बापट आणि स्वा. सावरकर यांसारख्या प्रतिभाशाली तरुणांनी कित्येक प्रकल्प प्रस्थापित करून चतुर इंग्रजांना आव्हान दिले. हे सर्व तरुण भारताच्या संपन्न, विद्याविशारद आणि उच्च पदांवर काम करणाऱ्या परिवारांशी संबंधित होते.

लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याद्वारे प्रस्थापित संस्था; भारत भवन या कार्यालयात सर्व तरुणांनी अगदी अनुशासित आणि व्यवस्थित पद्धतीने आपल्या गतिविधींना पूर्णत्वाकडे नेण्यास प्रारंभ केला. भारत भवनमध्ये भारताच्या गौरवशाली इतिहासाचे पतन होण्यामागचे कारण आणि समाधान अशा विषयांवर चर्चा व्हायची. फ्रांसमध्ये अध्ययन करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वत:ला या भारत भवनाशी जोडून घेतले. विनायक दामोदर सावरकर या भारत भवनाचे सक्रिय संचालक होते. याच भारत भवनातील एक विद्यार्थी होता; मदन लाल धिंग्रा.

भारत भवनाचे मुख्य संचालक; विशेषत: सावरकरांनी ब्रिटीश साम्राज्यवादाचे मूळ स्थान; लंदनमध्येच काहीतरी प्रचंड प्रहार करण्याचा विचार केला. भारतातील अमृतसर जिल्ह्यात राहणारा तरुण विद्यार्थी; मदन लाल धिंग्राने हे काम करण्यासाठी स्वत:ला सर्वांसमोर प्रस्तुत केले. त्याने सावरकरांकडे आदेशाची प्रार्थना केली. एका रात्री मदन लाल आणि सावरकर भारत भवनात एकांतात बसले होते. तेव्हा सावरकरांनी मदनलालला आपला डावा हात समोरील टेबलावर ठेवण्यासाठी सांगितले. जसा मदनलालने आपला डावा हात टेबलावर ठेवला, तसा सावरकरांनी त्याच्या हातावर चाकू मारला. त्याच्या हातातून रक्त वाहू लागले. मदनलालने हसतच सावरकरांकडे पाहिले. सावरकर मदनलालला छातीशी लावून म्हणाले, “तुझी परीक्षा पूर्ण झाली. तू वीरतापूर्वक कुठलेही क्रांतिकारी काम करू शकतोस.” योजनेनुसार मदनलाल इंग्रज अधिकाऱ्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका क्लबचा सदस्य बनला.

याच दिवसांत लॉर्ड कर्झन वायलीने इंग्रजभक्त भारतीय विद्यार्थ्यांची सभा बोलवली होती. मदनलालने कुठल्यातरी प्रकारे या सभेचे सदस्यत्व मिळवले. लॉर्ड कर्झन वायलीने भारतात राहून इंग्रजांच्या प्रशासनाला मजबूत ठेवण्यासाठी विशेषत: क्रांतिकारकांवर कित्येक जुलुम केले होते. २० वर्षांपर्यंत भारतात राहून या कुख्यात ब्रिटीश दलालाने शेकडो भारतीय क्रांतिकारकांना मृत्युदंड दिला. सावरकरांच्या योजनेनुसार त्याला यमलोकीं धाडण्याची मदनलालने प्रतिज्ञा केली. मात्र काम खूपच कठीण होते.

लंडनच्या जहांगीर हॉलमध्ये १ जुलै १९०१ रोजी एका सभेत कर्झन वायली प्रमुख अतिथी म्हणून येणार होता. मदनलाल आपल्या खिशात ६ बॅरलचे पिस्तुल घेऊन आपल्या साथीदारांसोबत जहांगीर हॉलमध्ये येऊन बसला. जसा कर्झन वायली बोलण्यासाठी उभा राहिला, तसा मदनलालने लगेच पुढे येऊन त्याला गोळ्या घातल्या. कर्झन जोरात जमिनीवर पडला. त्याच वेळी एका इंग्रजभक्त विद्यार्थी काकालालने मदनलालला पकडण्याचा प्रयत्न केला. मदनलालने आपल्या पिस्तुलमधील उरलेल्या गोळ्या काकालालच्या छातीवर झाडून त्यालाही साम्राज्यवादाचा दलाल म्हणून कठोर आणि योग्य शिक्षा दिली.

कर्झन वायलीवर झालेल्या या क्रांतीकारी हल्ल्यानंतर जहांगीर हॉलमध्ये गोंधळ माजला. मदनलालला तुरंत अटक करण्यात आली. या देशभक्तच्या खिशात चाकू आणि पिस्तुल निघाले. वृत्तपत्रांद्वारे या घटनेचा गोंधळ जगभर पसरला. ब्रिटीश साम्राज्यवादाचे दलाल या कृत्याची निंदा करू लागले; इथपर्यंत, की मदनलालच्या वडिलांनी लंडनमध्ये लॉर्ड मॉरेलला पत्र लिहिले., “अशा देशद्रोही किंवा हत्याराला मी आपला पुत्र म्हणण्यास तयार नाही.या मूर्खाने माझ्या तोंडावर डाग लावला.” या प्रकारे आपल्याच पित्याद्वारे निंदा आणि नालस्तीचा दु:खद अनुभव मदनलालला झेलावा लागला.

लंडनच्या एका कॅक्सटन हॉलमध्ये मदनलालद्वारे केल्या गेलेल्या कथित हत्येची निंदा करण्यासाठी एक शोकसभा बोलवण्यात आली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि सर आगाखान सारख्या काँग्रेसचे मोठे नेता देखील या शोकसभेत सामील झाले. या सर्वांनी या घटनेची खूप निंदा केली. मदनलालच्या मोठ्या भावालाही आपल्या पित्यासारखीच लाज वाटू लागली. ही अगदीच विक्षिप्त बाब आहे, की इंग्रजांद्वारे भारतवासियांसोबत होणाऱ्या अत्याचारांवर या नेत्यांना कसलीही लाच वाटत नव्हती. कर्झन वायलीने असंख्य भारतीय स्त्रियांच्या माथ्यावरील कुंकू पुसले होते, हजारो मुलांना अनाथ केले होते. कित्येक निरपराधींना आणि त्यांच्या घर-परिवारालाही उद्ध्वस्त केले होते. या सर्व कुकृत्यांवर मौन साधणाऱ्या नेत्यांना देशभक्त म्हणणे, देखील देशभक्तांचा अपमानच होता.

या शोकसभेत वीर सावरकर सुद्धा आपल्या मित्रांसोबत बसले होते. मदनलालची निंदा होत असतांनाही सावरकर रक्ताचा घोट पिऊन बसले होते. मात्र सर आगा खान उभे राहून बोलू लागले, “ही सभा सर्वसंमतीने निंदा प्रस्तावाला पारित करीत आहे.” तितक्यात सावरकर उभे राहून मोठ्या आवाजात म्हणाले, “नाही नाही! सर्वसंमतीने आजिबात नाही. मी विनायक दामोदर सावरकर; या प्रस्तावाला प्रबळ विरोध करीत आहे.” सावरकरांचे नाव ऐकताच सभेत स्मशानशांतता पसरली. काहींचे तर हृदय कंपित होऊ लागले होते.

पामार नामक एक इंग्रज सावरकरांच्या गालात जोरदार चापट मारून म्हणाला, “जरा या इंग्रजी फटक्याचा स्वाद तर घे!” तितक्यात सावरकरांचा एक साथीदार; आचार्याने त्या इंग्रजाच्या तोंडात जोरदार चापट लगावली आणि म्हणाला, “जरा या भारतीय फटक्याचाही स्वाद घेऊन बघ!” सभेत गोंधळ माजू लागला. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आगाखान तर पहिल्यापासूनच घाबरून पळाले होते. याप्रकारे लंडनमध्येच कर्झन वायलीच्या हत्येवरील निंदा प्रस्तावही पारित होऊ शकला नाही.

जेव्हा वेस्टमिंस्टर न्यायालयात मदनलालवर खटला चालू झाला, तेव्हा मदनलालने आपले ते लिखित वक्तव्य वाचण्याची इच्छा वर्तवली, जिला पोलिसांनी आपल्याजवळ ठेवले होते. हे वक्तव्य सावरकरांनीही तयार केले होते. मदनलालने हे वक्तव्य वाचण्यास सुरुवात केली, “जे शेकडो अमानुष फाशी आणि काळ्या पाण्याची शिक्षा आमच्या देशभक्तांना दिली जात असतांना, मी त्याचा हा साधारणपणे प्रतिकार म्हणून या इंग्रजाचे रक्त शोषण्याचा प्रयत्न केला आहे. मी यासंबंधित आपल्या विवेकाशिवाय अन्य कुणाचाच सल्ला घेतलेला नाही. कुणाच्याही सोबत कसलेही षड्यंत्र केले नाही. मी फक्त केवळ आपले कर्तव्य पूर्ण करण्याची चेष्टा केली आहे. एक जात; जिला विदेशी शक्तींद्वारे दबल्या जात असेल तर समजून घ्यायला हवं कि ती जात बरोबरीचे युद्ध लढत आहे. एक निशस्त्र जातीसाठी खुले युद्ध तर संभव नाही. मी एक भारतीय होण्याच्या नात्याने असे समजतो, कि जर आपल्या मातृभूमीच्या सुपुत्रांवर कुणी जुलुम करत आहे तर तो ईश्वराचाही अपमान करत आहे. आपल्या मातृभूमीचे हित हेच प्रभू श्रीरामांचे हित आहे. तिची सेवा हीच श्रीकृष्णाची सेवा आहे. भारतीय या क्षणी केवळ इतके करू शकतात, कि त्यांनी मरण शिकावे आणि हे शिकण्याचा फक्त एकच उपाय आहे, तो म्हणजे त्यांनी स्वतः मरावे. यामुळेच मी मरेन आणि मला या बलिदानाचा अभिमान आहे. वंदे मातरम् !”

कर्झन वायलीची हत्या आणि मदनलालच्या वक्तव्यामुळे जगभरात खळबळ माजली. जर भारतीय तरुण इंग्लंडची राजधानी लंडनपर्यंत देखील त्यांची क्रांती घेऊन आले आहेत, याचा अर्थ आहे, कि भारतात इंग्रजांनी हुकूमशाही पसरवून भारतीयांवर अमानुषपणे अत्याचार केले आहेत. जगातल्या बाकी सर्व देशांमध्ये भारतासाठी सहानुभूती निर्माण झाली. जगातल्या सर्व लोकांचे मत इंग्रजांविरुद्ध झाले.

जेव्हा शेवटच्या वेळी मदनलालला न्यायालयात सादर केले गेले तेव्हा त्याच्या वक्तव्यामुळे भारतीय तरुणवर्गात धैर्याचा अद्भुत संचार झालेला होता. निकाल देणाऱ्या न्यायाधीशाकडे निधड्या छातीने पाहत मदनलाल म्हणाला, “मी माझ्यावर तुमचा कोणताही हक्क स्विकारत नाही. त्यामुळे तुम्हांला जे वाटेल ते तुम्ही करू शकता. मी काहीही गुन्हा केलेला नाही. जे काही केले आहे ते माझ्या देशासाठी केले आहे. ज्या प्रकारे जर्मनीला इंग्लंड वर राज्य करण्याचा काहीही अधिकार नाही, त्याचप्रमाणे इंग्रजांना भारतावरही राज्य करण्याचा कसलाही अधिकार नाही. माझी अशी इच्छा आहे, कि तुम्ही मला फाशीची शिक्षा द्यावी. त्यामुळे भारतीयांमध्ये तुमच्याविषयी तिटकारा आणि सुडाच्या भावनेचा उद्रेक होऊन त्या आगीत ब्रिटीश सत्ता जळून खाक होऊन जाईल.”

लक्षात घ्या, की मदनलालच्या अटकेच्या वेळी पोलिसांनी त्याचे खिशात ठेवलेले वक्तव्य हिसकावून घेऊन आपल्याकडे ठेवले होते. मदनलालला न्यायालयात हे वक्तव्य वाचू दिले गेले नाही. हे वक्तव्य सरकारकडे कुलूपबंद होते. परंतु मदनलालच्या फाशीच्या एक दिवस आधीच, म्हणजेच २६ ऑगस्टलाच ते जगभरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. सरकार या घटनेने केवळ अचंबितच झाले नाही, तर त्यांची नाचक्की सुद्धा झाली. सरकार अवाक् होते, की त्यांच्याकडे कुलूपबंद असलेले हे वक्तव्य वर्तमानपत्रांपर्यंत कसे पोहोचले.

वास्तविकतेत या वक्तव्याची एक प्रत सावरकरांनी आपल्याकडे ठेवली होती. सावरकरांनी याच्या एक हजार प्रती छापल्या होत्या. श्यामजी कृष्ण वर्मांनी हे वक्तव्य पॅरिस पासून अमेरिकेपर्यंत वर्तमान पत्रांकडे पाठवून दिले. या वक्तव्याच्या प्रकाशनामुळे जगात अनेक देशांमध्ये सशस्त्र क्रांतीचा संदेश पोहचवल्या गेला. २७ ऑगस्टला त्याला फाशी देण्याचा निर्णय झाला. मदनलालने फाशी देण्याच्या आधी हे शब्द उच्चारले, “परमेश्वराला माझी हीच प्रार्थना आहे, कि मी परत भारतात जन्माला येऊन याच पवित्र कार्याकरिता प्राणाचे बलिदान द्यावे.”

फाशीनंतर लंडनमध्ये राहणाऱ्या हिंदूंनी मदनलालच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली. परंतु सरकारने या मागणीचा स्वीकार केला नाही. क्रांतिकारक हरदयाल यांनी कारागृहाच्या आवारातच या हुतात्म्याला हिंदू रीतीनुसार अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था केली. मदनलालने आपले देशप्रेम, विश्वास आणि देशभक्तीची रक्षा आपले प्राण देऊन केली. भविष्यातल्या क्रांतिकारकांसाठी हे बलिदान एक प्रेरणा ठरले.

क्रमश:

नरेंद्र सहगल
पूर्व संघप्रचारक, लेखक, पत्रकार

मराठी अनुवाद – धनश्री कुलकर्णी

author avatar
नरेंद्र सहगल