जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२५ । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी एक मोठी कारवाई केलीय. ती म्हणजे चाळीसगाव नजीकच्या धुळे-सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटात एका मोटारीतून तब्बल ६० कोटी रूपये किमतीचा ३९ किलो अँफेटामाइन अंमली पदार्थाचा साठा जप्त केला. या कारवाईने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित मोटार चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, पोलिसांनी पुढील तपासाला गती दिली आहे.

याबाबत असे की, चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या कन्नड घाटात गुरुवारी सायंकाळीच्या सुमारास चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी करत असताना नियमित तपासणीचा भाग म्हणून त्याची कार (डी.एल.बी.बी.७७७१) अडवली. तपासणी केली असता मोटार चालकाकडे कोणताही परवाना नव्हता. शिवाय तो सहकार्य न करता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांना मोटारीत काहीतरी असल्याचा संशय आला.

त्यामुळे त्याच्या ताब्यातील मोटारीची संपूर्ण झडती घेण्याचा निर्णय पोलिसांना घेतला. तपासणी केल्यावर मोटारीच्या मागील सीटवर दोन बॅग आढळल्या. त्याबाबत विचारणा केल्यावर चालकाने समाधानकारक उत्तरे दिली नाही. तो टाळाटाळ करत असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी त्या दोन्ही बॅग ताब्यात घेतल्या. त्यानंतर मोटारीच्या डिक्कीतही आणखी दोन बॅग सापडल्या. चारही बॅग उघडून पाहिल्यावर आतमध्ये तब्बल ३९ किलो वजनाचा अँफेटामाइन या अंमली पदार्थाचा साठा लपवून ठेवल्याचे दिसून आले.
याप्रकरणी दिल्ली येथील सय्यद नामक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अँफेटामाइनचा वापर एमडी ड्रग्जमध्ये केला जात असून त्याचे बाजार मूल्य प्रतिकिलो दीड ते दोन कोटी रुपये आहे. चालकाकडे या प्रकरणाची चौकशी केली जात असून त्याच्या माध्यमातून मालकाचे नाव पुढे येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच संबंधित चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी महामार्ग पोलीस केंद्राला भेट देत संपूर्ण कारवाईची माहिती घेतली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची माहिती दिली गेली असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे.












