जळगावात आजपासून रंगणार ‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२४ । आपल्या जळगाव शहराचा सांस्कृतिक महोत्सव ‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ आज दि. २२ ऑगस्टपासून छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगणार आहे. त्यासाठी शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला असून एकूण ११ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. जळगावकर रसिकांनी महोत्सवात सहभागी होऊन कलाकारांचा उत्साह वाढवावा असे आवाहन आयोजक आ. सुरेश भोळे तथा राजूमामा भोळे व भरारी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक परदेशी यांनी केले आहे.
जळगावचं नाव सांस्कृतिक गाव व्हावं यासाठी अनेक संस्था, व्यक्ती सातत्याने प्रयत्नरत आहेत. शहराच्या सांस्कृतिक वाटचालीत मोलाचा हातभार लागावा यासाठी बालवयातच आपल्या संस्कृतीची, लोकपरंपरांची आणि लोककलांची ओळख विद्यार्थी – विद्यार्थिनींना व्हावी, त्यांच्या जडणघडणीला विविध कलांचा आयाम लाभून उद्याचा जागरुक व सुसंस्कृत नागरिक घडावा, या उद्देशाने दि. २२ ते २५ ऑगस्टदरम्यान या महोत्सवाचे आयोजन आ. राजूमामा भोळे यांच्यावतीने करण्यात आले आहे. ‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ चे यंदा पहिलेच वर्ष आहे.
महोत्सवात गुरुवारी दि. २२ ऑगस्ट रोजी पहिल्या दिवशी सकाळी १०. ३० वाजता उदघाटन मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. त्यानंतर महोत्सवाला सुरुवात होईल. पहिले रांगोळी व मेहंदी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर शालेय व खुला गटात समूह गायन स्पर्धा ११ वाजता सुरु होईल. दुपारी १ वाजता एकल नृत्य स्पर्धा तर दुपारी ३ वाजता महिला भजनी मंडळाचा गायन महोत्सव होणार आहे. एकंदर या स्पर्धेत कलाकारांना त्यांची कला सादर करण्यास मोठी संधी उपलब्ध झाली आहे. स्पर्धेचे समन्वयन सचिन महाजन, दिपक महाजन, पंकज बारी हे करीत आहे. जळगावकर रसिकांनी महोत्सवात सहभागी होऊन कलाकारांचा उत्साह वाढवावा असे आवाहन आयोजक आ. सुरेश भोळे तथा राजूमामा व भरारी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक परदेशी यांनी केले आहे.