जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । अमळनेर तालुक्यातील जळोद येथे गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता तापी नदीतून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पोलिसांनी छापा टाकून धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी सात डंपर व एक जेसीबीसह ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून चालक मालकासह १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील आतापर्यंत झालेली सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे वाळू वाहतुकदारांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या कित्येक दिवसांपासून जळोद येथून तापी नदीतून मोठ्या प्रमाणात जेसीबी मशीनने वाळू उपसा करून डंपरच्या साहाय्याने वाळू चोरी केली जात होती. अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे, रवींद्र पाटील, भूषण बाविस्कर, अमोल पाटील, योगेश महाजन, सूर्यकांत साळुंखे यांचे पथक रात्रीची गस्त घालत असताना तापी नदीत अनेक डंपर वाळू वाहतुकीसाठी उतरल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी अचानक छापा टाकला असता तेथे सात डंपर व एक जेसीबी मशीन आढळून आले तर इतर डंपर व ट्रॅक्टर तसेच जेसीबी मशीन पळवून नेण्यात आले.
४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी १० लाख रुपये किमतीचे जेसीबी (एमएच१९/सीयु५७६५) हा चालक गोपाळ रवींद्र पाटील (नांद्री) व मालक अमोल रमेश पाटील (अमळगाव), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/एम४६८५), चालक व मालक विक्की सतीश ललवाणी, ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच १९/झेड- १९७०) चालक व मालक दीपक शालीक पाटील (नांद्री), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/एम५९४९) चालक विनोद महादू निकम (शिरुडनाका) व मालक किशोर बापू पाटील (विवेकानंद नगर), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/बीजी७०३१) चालक दिनेश नागो पाटील (बुधगाव, ता. चोपडा) व मालक अरुण पुंडलिक पाटील (रवीनगर), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/बीए २९०), चालक संतोष हिरामण जावळे (वाघोदा) व मालक अरुण पुंडलिक पाटील, ५ लाख रुपये किमतीचे डंपर (जीजे ०१ डीझेड७५०)वरील चालक दिलीप आत्माराम पाटील (वाघोदे) व मालक सुरेश देविदास वालडे, ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच०४/डीडी२१३६) चालक पपू शांताराम शिंगाणे (भोईवाडा), मालक भूषण आत्माराम बडगुजर यांच्यावर अवैध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याजवळील ३६ हजार रुपयांची वाळू असा एकूण ४५ लाख ३६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
आण्णा उर्फ अर्जुन वासुदेव कोळी (जळोद) याच्या मालकीचे एक जेसीबी, ४ ट्रॅक्टर व १ डंपर नदी पात्रातून पळून गेले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहेत.
चारवेळा निविदा काढूनही ठेका नाही
अमळनेर तालुक्यात बोरी नदीतून ट्रॅक्टर व टेम्पोद्वारे, तापी नदीतून डंपर व ट्रॅक्टरद्वारे तर पांझरा नदीतून ट्रॅक्टर व डंपरद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे महसूल कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने सरार्स वाळू चोरता येत आहे. त्यामुळे चारवेळा निविदा काढूनही कोणीही ठेका घेण्यास पुढे आले नाही. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडून पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंद वाघ यांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.