जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२५ । जळगाव जिल्ह्यात आठवड्यातून एक-दोन तरी लाचखोरीची बातमी समोर येत आहे. अशातच चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना अमळनेर तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंत्यास एसीबीने रंगेहाथ पकडले. दिलीप पाटील असे लाचखोर अभियंत्याचे नाव असून या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप पाटील यांच्याकडे धरणगाव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा देखील पदभार होता. तेथील एका प्रकरणात मंजुरीसाठी दिलीप पाटील याने चार हजार रुपयांची लाच मागितली. मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली.

या तक्रारीनंतर एलसीबीने सापळा रचत अभियंता दिलीप पाटील याला तक्रारदाराकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. नंदुरबार आणि जळगाव विभागाच्या लाचलुचपत विभागाने बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.












