जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२३ । बंगालच्या उपसागरात तीव्र कमीदाबाचा पट्टा तयार झाल्याने मिचाँग चक्रीवादळ तयार झालं आहे. या चक्रीवादळाचा तडाखा देशातील काही भागाला बसला असून यामुळे राज्यासह देशातील वातावरणात देखील बदल झाला आहे. सध्या तामिळनाडू, केरळ-माहे या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून अशातच हवामान विभागाने आज देशात अनेक ठिकाणी पावसाचा अलर्ट जारी केलाय.

कुठे होणार पाऊस?
पुढील काही दिवस राज्यासह देशातील काही भागांत गारापीट, मुसळधार पाऊस आणि दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात ज्या ठिकाणी पाऊस नसेल तेथे कडाक्याची थंडी जाणवू शकते. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असून त्यापूर्वी येऊन गेलेल्या अवकाळी पावसाने तापमानाचा पारा प्रचंड घसरला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे सर्वत्र धुके पडत आहे. यामुळे थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीपासून ऊब मिळावी यासाठी शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.
पुढील चार ते पाच दिवस महत्वाचे
पुढील चार ते पाच दिवसांत केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याने दिलीये. तर राज्यातील कोकणासह विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे.