Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । दरमहा येणार्या वीज बिलामध्ये वीज लोड दुरुस्ती करून देण्यासाठी एमआयडीसी विभागातील वीज कंपनीचे अभियंता पाचंगे यांच्या नावाने दहा हजारांची लाच मागणी करणार्या खाजगी इसमाविरोधात एमआयडीसी पोलिसात जळगाव एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यामुळे खळबळ उडाली आहे.
अनिल सुधाकर सासनिक (35, रा.प्लॉट नं.7, श्रद्धा कॉलनी, महाबळ, जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या खाजगी इसमाचे नाव आहे. जळगावातील तक्रारदार यांचे एमआयडीसी परीसरात साई सर्व्हीस नावाने कार रीपेअरिंगचा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या ठिकाणचे विद्युत मिटर हे कमर्शियल असुन सँक्शन लोड 26 केडब्लू असतांना येणार्या वीज बिलामध्ये लोड केडब्ल्यू येत असल्याने व्हिजीलन्सच्या तपासणीनंतर वाढीव बिल येत होते.
लोड 18 करून देण्यासाठी व वीज बिलात दुरुस्ती करण्यासाठी आरोपी अनिल सासनिक यांनी 10 हजारांची लाच मागितली होती मात्र न स्वीकारल्याने सापळा यशस्वी झाला नव्हता मात्र 22 ऑगस्ट 2022 रोजी लाच मागणी सिद्ध झाल्याने सोमवार, 5 सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस.के.बच्छाव, निरीक्षक एन.एन.जाधव एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनील पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, जनार्धन चौधरी, सुनील शिरसाठ, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळु मराठे, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ, राकेश दुसाणे, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.