जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । सावदा येथील नवीन हद्दवाढ झालेल्या भागाची पाणीपट्टी नियमित दराने आकारणी करण्याची मान्यता मिळाली आहे. या मागणीसाठी माजी नगरसेवक फिरोजखान पठाण गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

येथील नवीन हद्दवाढ झालेल्या भागात दुपटीची पाणीपट्टी सन 2019 पासून येत होती. ती कमी व्हावी यासाठी माजी नगरसेवक फिरोजखान पठाण गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करीत होते. तसेच दि. 14 रोजी स्वतः हद्दवाढ झालेल्या भागातील नागरीक नगर पालिकेत दाखल झाले. दरम्यान, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी त्यांना प्रशासक व प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी नुकतेच याबाबत निर्णय घेऊन सन 2021 – पासूनची पाणीपट्टी शहरा प्रमाणेच म्हणजे 1400 रुपये केल्याचे सांगितले. व याच प्रमाणे यावर्षी आकारली जाईल अशी ग्वाही दिली.

यामुळे माजी नगरसेवक फिरोजखान पठाण यांचे लढ्यास यश आले असून येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी उपस्थित होते. यावेळी नागरिक व दोघे माजी नगरसेवक फिरोजखान व राजेंद्र चौधरी यांनी प्रशासक तथा प्रांतअधिकारी कैलास कडलग व मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांचे आभार मानले.







