जळगाव जिल्ह्यात वादळीमुळे शेती पिकांचे नुकसान; पालकमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

जून 13, 2025 11:06 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२५ । बुधवारी रात्री जळगाव जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्याने व विजाच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव तालुक्यातील धानवड, उमाळा-देवरी, दापोरा या गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी केळी पिकाच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि शासन मदतीसाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.

New Project 1 1

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्वप्रथम धानवड शिवारातील अनिल काशिनाथ पाटील यांच्या केळी बागेचे नुकसान प्रत्यक्ष पाहिले. या वादळात संपूर्ण बाग जमीनदोस्त झाल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर त्यांनी धानवड गावातीलच देवसिंग पवार यांच्या पत्र्याच्या घराचे अवशेष पाहिले. वादळात घराचे पत्रे उडून गेले असून संपूर्ण घर कोसळले आहे. या प्रकरणी प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून संबंधित लाभार्थ्याला कोणत्या आवास योजनेत समाविष्ट करता येईल याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

पुढे उमाळा-देवरी शिवारातील मधुकर रामचंद्र खडसे, शिवाजी मांडे, संतोष मांडे, ज्ञानेश्वर मांडे या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी पिकांची पाहणी केली. त्या ठिकाणी केळी बागा पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर दापोरा येथे सागर प्रदीप घुले यांच्या शेतात झालेल्या नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्याने व्यक्त केलेल्या हताश भावना पालकमंत्र्यांनी समजून घेतली. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानाची दखल घेत शासनाकडून शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिली.

या दौऱ्यादरम्यान बुधवारी रात्री झालेल्या अपघाताचीही पालकमंत्र्यांनी दखल घेतली. वादळी वाऱ्याच्या दरम्यान कंडारी फाटा परिसरात शरद समाधान पाटील (वय ४०, रा. उमाळा) यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पालकमंत्र्यांनी शरद पाटील यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून योग्य ती मदत मिळवून देण्याबाबत कृषी विभागाला निर्देश दिले. शरद पाटील यांचे एक मुलगा आणि एक मुलगी असून त्यांनाही पालकमंत्र्यांनी भेटून धीर दिला.

पालकमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्यात निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, तहसीलदार शितल राजपूत, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय यंत्रणा उपस्थित होत्या. सर्व पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून, शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन सदैव त्यांच्या पाठीशी उभे आहे, असा पुनरुच्चार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या वेळी केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment