पाचोऱ्यात शिवसेना पाठोपाठ भाजपचे ‘एकला चलो रे’

नोव्हेंबर 6, 2025 11:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२५ । महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगूल वाजलं असलं तरी जळगाव जिल्ह्यात सत्ताधारी महायुती पक्षांमध्ये सारं काही आलबेल आहे, असं म्हणता येणार नाही. कारण जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेना शिंदे गट पाठोपाठ आता भाजपनेही ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे. पाचोरा-भडगावचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळावर लढण्याचे आव्हान दिल असून आता चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील आमदार पाटील यांना थेट आव्हान देत भाजप स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पाचोऱ्यात महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातच प्रमुख लढणार असेल हे स्पष्ट झाले आहे.

mangesh chavan

पाचोरा येथे बुधवारी भाजपचा परिवर्तन मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार स्मिता वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी, माजी आमदार दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी, अमोल शिंदे, अमोल पाटील, संजय वाघ, मधुकर काटे, संजय पाटील उपस्थित होते. दरम्यान या मेळाव्यातून मंगेश चव्हाण यांनी किशोर पाटील यांना थेट आव्हान दिले. ते म्हणाले, आमदार पाटील यांनी चाळीसगाव नगरपालिकेत एक नगरसेवक निवडून आणून दाखवावा. तसे केल्यास मी पाचोर्‍यात येऊन त्यांचा सत्कार करीन असं आव्हान दिलं आहे.

Advertisements

चार दिवसांपुर्वी पाचोऱ्यात झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी निधीवरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. या टीकेचा संदर्भ देत आ. चव्हाण यांनी किशोर पाटील यांच्यावर हल्ला चढवला. मंगेश चव्हाण म्हणाले की, आमदारांचा पगार काय? ते बोलतात काय? आता तर ते थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करू लागले आहेत. तलाठी आणि तहसीलदारांना दम देऊ लागले आहेत. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात भाजप मजबूतपणे उभा आहे. पालिका निवडणुकीत आम्हाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जे डोक्यात घेतात ते पूर्ण करतात, असा सूचक इशारा त्यांनी दिला.

Advertisements

दरम्यान पाचोऱ्यात शिंदेसेना आणि भाजप या दोन्ही मित्रपक्षांच्या मेळाव्यांमध्ये विरोधकांऐवजी एकमेकांवरच आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या आहेत. दोन्ही बाजुने एकमेकांविरोधात लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यामुळे पाचोऱ्यात तरी दोन्ही पक्षात युती नसेल हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे धरणगाव, चोपडा, मुक्ताईनगर, पारोळा, एरंडोल येथे काय स्थिती राहिल हे लवकरच कळेल. शिवसेनेचे इतर आमदार किशोर पाटील यांच्याप्रमाणे स्वतंत्र लढणार की भाजपसोबत जाणार यावर जिल्ह्यातील युतीचे चित्र अवलंबून राहणार असेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now