शनिवार, डिसेंबर 2, 2023

इर्शाळवाडी दुर्घटना : तब्बल 36 तासानंतर महिलेला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढलं

जळगाव लाईव्ह न्यूज। २१ जुलै २०२३। रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली. यामध्ये आत्तापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जणांना वाचविण्यात यश आलं आहे. मात्र अद्यापही काही नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. बचाव पथकाचे कार्य निरंतर सुरूच आहे. त्यातच बचाव पथकाकडून एका महिलेला जिवंत बाहेर काढण्यात आलं आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या घटनेमध्ये अडकलेल्या १०० पेक्षा जास्त नागरिकांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. तर एका महिलेला मातीच्या ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आलं असून हा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. ही महिला तब्बल ३६ तासांपेक्षा जास्त काळ मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती. तिची मृत्यूशी झुंज अखेर यशस्वी ठरली आहे. सध्या तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री ११ च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर काल (गुरूवारी) दिवसभर बचावकार्य सुरू होते. यामध्ये अनेकांना वाचवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली असून जखमींवर सरकारकडून उपचार करण्यात येणार आहेत.