अभिनेता गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२४ । लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाचा पेच सुटत नसल्याने शिवसेनेने अद्याप उमेदवार जाहीर केला नाहीय. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळेल याची उत्सुकता लागली आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मुंबईच्या नरिमन पॉईंट येथे शिवसेनेच्या बाळासाहेब भवन या कार्यालयात गोविंदा याचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचं स्वागत केलं. यावेळी गोविंदाने आपली भूमिका मांडली.
काय म्हणाला गोविंदा
“नमस्कार, जय महाराष्ट्र! मी आज एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देतो. मी सर्वांना शुभेच्छा देतो. मी आज या पक्षात प्रवेश करतोय. मी राजकारणातून बाहेर पडल्यानंतर असं वाटलं नव्हतं की मी पुन्हा राजकारणात येईल. पण 14 वर्षांच्या राजकीय वनवासानंतर मी जिथे आहे त्याच पक्षात एकनाथ शिंदे यांच्या कृपाने पुन्हा या पक्षात आलोय. मी सर्वांचे आभार मानतो. मी राजकारणापासून लांब जात होतो. मी धन्यवाद देतो. पण आपल्याकडून मला मिळालेली ही जबाबदारी मी प्रमाणिकपणे पार पाडेन. मी सेवा प्रदान करेन. मी कला आणि संस्कृतीसाठी काम करेन. महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे”, असं गोविंदा म्हणाला.