⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

नाथाभाऊ… सीडी लावायची वेळ आली

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२१ । एखाद्यावर एका प्रकरणात आरोप झाल्यानंतर त्याला पक्षाने बाजूला करायचे ठरवले तर ते कोणत्याही प्रकारे करता येते याचे उदाहरण म्हणजे माजी मंत्री एकनाथराव खडसे. भोसरी येथील विवादित जागा खरेदी प्रकरणी चौकशीचा ससेमिरा मागे लागला, समिती गठीत झाली, समितीने क्लिनचिट दिली, सर्व काही सुरळीत असताना देखील त्यांना पुन्हा सन्मानाचे स्थान मिळालं नाही. 

अखेर काही महिन्यांपूर्वी एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेशप्रसंगी ‘तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेल’ असा खोचक टोला खडसेंनी लगावला होता. दरम्यान, बुधवारी सकाळी खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्याची बातमी येऊन धडकली. एकंदरीत खडसेंच्या कुटुंबाभोवती ईडी चौकशी लागली असून आता सीडी लावण्याची वेळ आली असल्याचे दिसून येत आहे.

भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी, जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांच्यावर भोसरी जमीन खरेदी प्रकरणी आरोप करण्यात आले होते. भूखंड खरेदी प्रकरणात दबावतंत्र वापरल्याचा आरोपही एकनाथराव खडसे यांच्यावर झाला होता. आरोपानंतर पक्षाने खडसेंना विचारणा केली आणि त्यानंतर खडसे यांनी राजीनामा दिला. इतक्या वर्षांची पक्षनिष्ठा आणि वरिष्ठांचा हात असल्यावर आपण चौकशीतून सहज बाहेर पडू असा विश्वास खडसेंना होता परंतु सारं काही उलटच घडले. चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. झोटींग समितीने आपला अहवाल सादर केला. 

अहवाल जाहीरपणे मांडण्यात आला नसला तरी खडसेंना त्यात क्लीनचिट मिळाल्याचे सांगण्यात आले. मुळात सर्व प्रकरण शांत झाले असे वाटत असले तरी खडसेंना मात्र मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. गेल्या विधानसभेचा कार्यकाळ असाच लोटल्यानंतर पक्षनिष्ठा म्हणून खडसे भाजपासोबत होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीप्रसंगी खडसे यांचा पत्ता कट करत मुलगी रोहिणी खडसेला पक्षाकडून संधी देण्यात आली. निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. राज्यात पक्षाच्या हातून सत्ता गेली तरी खडसे पक्षातच राहिले.

पक्ष आपली कोणतीही दखल घेत असून पक्षात वारंवार दुय्यम वागणूक मिळत असल्याचे लक्षात आल्यावर एकनाथराव खडसे यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार व जयंत पाटील यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. खडसेंनी भाजप सोडण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी देखील चर्चा केली होती. पक्ष सोडल्यानंतर होणाऱ्या नुकसानीचा आणि अडचणींचा ही त्यांनी आढावा घेतला. 

भाजप सोडल्यावर ईडीच्या चौकशीचा त्रास होणार याची कल्पना त्यांना अगोदरच होती. राष्ट्रवादीत प्रवेश करताना त्यांनी आपल्या भाषणात याबाबत बोलूनही दाखवले होते. तुम्ही लावली तर मी सीडी लावेल अशी धमकी वजा सूचना खडसेंनी दिली होती. गेले काही महिने सर्व सुरळीत राहिले पण मंगळवारी रात्री खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना मुंबईत ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले. भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणात चौकशी असल्याचे बोलले जात आहे.

जळगाव जिल्ह्यासह राज्यात गेल्या निवडणुकीपासून एका सीडीचा मुद्दा गाजत आहे. राज्यातील एका बड्या नेत्याच्या संदर्भात असलेली सीडी वेळ आल्यावर बाहेर काढून असे वक्तव्य माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह स्वर्गीय नरेंद्र अण्णा पाटील यांच्या गटाकडून करण्यात आले होते. आजपर्यंत या सीडीच्या केवळ चर्चाच असल्या तरी प्रत्यक्षात सीडी मात्र बाहेर आली नाही. शहरासह राज्यभरात काही दिवसांपूर्वीच बीएचआर पतसंस्था घोटाळा, जामनेर येथील व्यापारी संकुल प्रकरण, जळगाव शहरातील बाजार समिती व्यापारी संकुल यासह इतर काही प्रकरणे खडसे गटाकडून बाहेर काढण्यात आली होती.

सर्व प्रकरणांचा तपास सुरू असताना त्यात कुठे ना कुठे धागेदोरे माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांनीपर्यंत जाऊन पोहोचत होते. खडसे गटाचे सर्व पत्ते सरळ पडत असल्याचे वाटत असताना केंद्राचे ब्रह्मास्त्र खडसे  कुटुंबावर आले. शारदा खडसे यांचे पती गिरीश चौधरी यांना ईडीने ताब्यात घेतले. एकनाथराव खडसे यांना अगोदर आपल्या जावयाला चौकशीतून बाहेर काढायचे आहे, पत्नीला चौकाशीपासून वाचवायचे आहे आणि त्यानंतर सीडीचा मुद्दा बाहेर काढायला त्यांना संधी आहे. ईडीची चौकशी लागली असून सीडी केव्हा लागणार असे मेसेज सोशल मीडियात पसरत असून नागरिकांना देखील सीडीची उत्सुकता लागून आहे.