परिवर्तनाचे काम करीत असताना हौतात्म्य स्वीकारण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी – डॉ.व्ही.आर.पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । कोंबडा सकाळी लोकांना जागे करण्याचे काम करतो. मात्र तरीही लोकं त्याला कापून टाकतात. तसेच अंनिसच्या कार्यकर्त्यांचे आहे. संत-समाजसुधारकांचा वारसा चालवित असताना त्यांना हौतात्म्य पत्करण्याची वेळ आली आहे. परिवर्तनाचे काम करीत असताना हौतात्म्य स्वीकारण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदाननंतरही संघटना अधिक जोमाने वाढली, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक रविवार दि १२ जून रोजी मराठा महाविद्यालय येथे पार पडली. बैठकीचे उद्घाटन सकाळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. व्ही.आर.पाटील (पाळधी), उद्योजक यशवंत बारी, अंनिसचे निरीक्षक राज्य सरचिटणीस विनायक सावळे, राज्य पदाधिकारी प्रा डी.एस. कट्यारे, शहराध्यक्ष प्रा. दिलीप भारंबे मंचावर उपस्थित होते.
सुरुवातीला झाडाला पाणी टाकून मान्यवरांनी उद्घाटन केले. यानंतर राज्य कार्यकारिणी बैठकीत गौरविलेल्या जिल्ह्यातील दोघांचा सन्मान या वेळी करण्यात आला. यामध्ये प्रा. डिगंबर कट्यारे आणि जळगाव शाखेचा सन्मान झाला आहे. तसेच राज्य कार्यकारणीमध्ये नुकतीच पुनर्निवड झालेले राज्य सरचिटणीस विनायक सावळे, मानसिक प्रकल्प विभागातील कार्यवाह म्हणून डॉ. प्रदीप जोशी आणि राज्याच्या वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प कार्यवाहपदी निवड झालेले प्रा. डी. एस. कट्यारे यांचा मान्यवरांनी गौरव केला.
यावेळी राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी बिजभाषण केले. शाखा वाढवण्यासाठी सातत्याने संपर्क वाढविले पाहिजे, नियमितपणे संपर्कात राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यानंतर, समितीचे कार्यकर्ते मन लावून स्वतःला झोकून देऊन काम करतात. त्यांना समाजातून सहकार्य मिळाले पाहिजे, असे यशवंत बारी यांनी सांगितले. तर बुवाबाजी करणार्यांकडे आजही गर्दी जमते. पण समाजप्रबोधन करणाऱ्या संघटनांकडे येण्याची लोकांची मानसिकता नसते, ही खेदाची बाब असल्याचे डॉ. व्ही. आर. पाटील यांनी सांगितले.
सूत्रसंचालन प्रा.डॉ.कल्पना भारंबे यांनी तर आभार शहर कार्याध्यक्ष जितेंद्र धनगर यांनी मानले.