जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी जळगाव जिल्हा कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या अचानक तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ६२ कृषी सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल २१ केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द तर २० केंद्रांचे परवाने निलंबित तर २१ परवानाधारकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभागाच्या पथकांनी जिल्ह्यातील विविध केंद्रांची आकस्मिक तपासणी केली. या मोहिमेत अनेक केंद्रांवर खते, बियाणे आणि कीटकनाशकांच्या विक्रीत गंभीर त्रुटी आणि अनियमितता आढळून आल्या. रेकॉर्ड अद्ययावत नसणे, साठेबाजीत तफावत आणि नियमावलीचे पालन न करणे यांसारख्या बाबी उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत २१ कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून २० केंद्रांचे परवाने ठराविक काळासाठी निलंबित करण्यात आले असून, त्यांना विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच २१ परवानाधारकांना सुधारणेची शेवटची संधी देत सक्त ताकीद देण्यात आली आहे. यामध्ये पाचोरा तालुक्यातील १६ कृषी परवानाधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याखालोखाल यावल तालुक्यात १५ परवान्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
कृषी विभागाने पुढील काळातही अशाच प्रकारच्या अचानक तपासण्या सुरू ठेवणार असल्याचा इशारा दिला असून, शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.







