⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

चितोड्यात अवैध गावठीदारू विक्रेत्यांवर कारवाई; ३० लिटर दारू जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । यावल तालुक्यातील चितोडा गावी अवैधरीत्या गावठी दारू विक्री होत असल्याची तक्रार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडे प्राप्त झाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकून दोघांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ३० लिटर दारू जप्त करण्यात आली.

चितोडा येथे अवैध गावठी हातभट्टीची दारू चंद्रकांत पंडीत पाटील व बशीर मेहताब तडवी हे विक्री करतात, अशी माहिती जळगाव जिल्हा गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे किरण मोहन धनगर, प्रमोद अरुण लाडवंजारी, यावल पोलिस ठाण्याचे किशोर नारायण परदेशी व संदीप सूर्यवंशी यांचे पथक गठीत करून चितोडा गावात दाखल झाले. गावातील पटांगणात चंद्रकांत पाटील व बशीर तडवी हे अवैध गावठी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याचे आढळून आले. त्यामुळे दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. या दोघांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी किरण धनगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.