जळगाव लाईव्ह न्यूज । पुणे आणि चिंचवड येथील विषारी दारूमुळे अनेकांना जीव गमवावा लागला असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव पोलिसांनी अवैध मद्यविक्रीविरोधात मोठी मोहीम राबवत दोन ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत शहरातून १ लाख २० हजार रुपये किमतीच्या बनावट देशी दारूच्या ३ हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या, तर तालुक्यातील लोंढे येथे सुरू असलेली हातभट्टी उद्ध्वस्त करण्यात आली.

पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहरातील स्वप्नील बापू जाधव याच्या ताब्यातून टँगो पंच या ब्रँडच्या बनावट देशी दारूचे ३० बॉक्स जप्त केले. या बॉक्समध्ये एकूण ३ हजार बाटल्या असून त्यांची अंदाजे किंमत १ लाख २० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी लोंढे गावाच्या शिवारातील बेकायदेशीर हातभट्टीवर छापा टाकला. या ठिकाणी १,८२५ लिटर रसायन आणि ५० लिटर गावठी दारू असा एकूण ७५ हजार २५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला.
या प्रकरणी गुलाब बोरसे, आधार पवार आणि एका महिलेसह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विषारी दारूमुळे घडणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती आणि विक्रीविरोधातील कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.










