⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

बसचालकाला मारहाण करणे भोवले, आरोपीला तीन वर्ष सक्तमजुरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । एसटी बसचालकास बेदम मारहाण व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी २०१५ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीला न्यायालयाने बुधवारी तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. ललित उर्फ छन्नू प्रकाश पाटील (वय ४५, रा. नेरी, ता. जामनेर) असे आरोपीचे नाव आहे.

पाचोरा बस आगाराचे चालक वाल्मीक सोमा जाधव हे दि.३१ डिसेंबर २०१५ रोजी बस क्रमांक एमएच.१४.बीटी.४५४ ने पाचोऱ्याहून चाळीसगाव जात होते. पाचोरा तालुक्यातील आखतवाडेजवळ ललित पाटील याने बससमोर चारचाकी उभी केली. यानंतर जाधव यांना धमकी दिली. जाधव हे बस घेऊन नेरी येथे आले असता ललित पाटील याने बस थांबवून जाधव यांना बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. जाधव यांनी नगरदेवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दोषारोप सादर केल्यानंतर याप्रकरणी न्यायाधीश एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणीअंती पाटील याला दोषी धरून न्यायालयाने त्यास ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. खटल्यात सरकार पक्षातर्फे ऍड.सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी यांनी सहकार्य केले.